जळगाव : भुसावळ शहरातील वांजोळा गावाच्या रस्त्यावर एका तरुणाचे कमरेच्या वरील अर्धे शरीर असलेला सांगाडा सापडल्याने खळबळ उडाली होती. तरुणाची ओळख पटवण्यासह मारेकऱ्यांचा शोध घेण्यापर्यंत अंत्यत क्लिष्ट स्वरुपाच्या गुन्ह्याचा भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनसह स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. दगडाने ठेचून दोघा मित्रांनी तरुणाची हत्या केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. रोहित दिलीप कोपरेकर (वय २१, रा. रामदेवबाबा नगर, भुसावळ) असं मृत तरुणाचं नाव असून राहुल राजेश नेहते (रा. पाटील मळा, भुसावळ) आणि सागर दगडू पाटील (रा. खडकागाव, भुसावळ) अशी अटकेतील दोघा आरोपींची नावे आहेत.

पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात २ जून रोजी रोहित कोपरेकर हा तरुण बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. तीन दिवसांनंतर ५ जून रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास भुसावळ शहरातील वांजोळा रोडवर कुजलेला मृतदेह आढळून आला होता. घटनास्थळी आढळलेल्या चप्पल आणि कपड्यांवरुन मृत तरुणाची ओळख पटली होती. मृतदेह घेवून जाणे अशक्य असल्याने जागेवरच घटनेचा पंचनामा करण्यात आला होता. तसंच त्याची दगडाने ठेचून हत्या केल्याचं स्पष्ट झालं होतं. या अनुषंगाने भुसावळ बाजारपेठ पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी तपासाला वेग दिला होता.

१५ वर्षे काम करत ‘त्याने’ विश्वास संपादन केला, अन् दागिणे, रोकड घेवून पसार झाला

भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी या परिसरातील हॉटेल ढाबे अशा ठिकाणी चौकशी केली. यात एका ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन तरुण हॉटेलातून बाहेर पडताना दिसत होते. या सीसीटीव्ही फुटेजवरुन पोलिसांना गुन्ह्याच्या तपासाचे धागेदोरे गवसले. रोहित कोपरेकर याच्यासोबत दोन तरुण मद्यप्राशन करताना आढळून आले होते. तसंच घटनास्थळावरुन मृताची दुचाकी घेवून दोघेही संशयित रवाना झाल्याचंही नशीराबाद टोलनाका येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले होते. त्यानुसार पोलिसांनी दोघांची नावे निष्पन्न केली आणि राहुल नेहते आणि सागर पाटील यांना ६ जून रोजी डोंबविली येथून अटक केली होती. गळा दोरूने आवळून तसंच दगडाने ठेचून रोहित कोपरेकर याचा खून केल्याची कबुलीही दोघांनीही दिली आहे.

दरम्यान, पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे राहुल गायकवाड, सहाय्यक पोलीस निरिक्षक मंगेश गोटला, सुदर्शन वाघमारे, पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय नेरकर, किशोर महाजन, उमाकांत पाटील, निलेश चौधरी, तेजेय पारिसकर, प्रशांत परदेशी, प्रशांत सोनार, सचिन पोळ, सचिन चौधरी, योगेश माळी, जावेद शहा यांच्या पथकाने या गुन्ह्याचा उलगडा करुन अवघ्या २४ तासात मारेकऱ्यांना जेरबंद केले. या पथकाला पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी बक्षीस जाहीर केलं आहे.

पोलीस स्टेशन आहे की हळदीचा मांडव ? पोलीस ठाण्यात बर्थडे सेलिब्रेशन करत पोलिसांचा झिंगाट डान्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here