‘विधान परिषदेवर संधी मिळाली तर तिचे सोने करू’, असे वक्तव्य भाजपा नेते माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले होते. मात्र, विधान परिषदेसाठी इच्छुक असलेल्या पंकजा मुंडे यांना भाजपाने मोठा धक्का दिला आहे. भाजपाकडून पाच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पंकजा मुंडे यांचे नाव नसल्याने हा त्यांना फार मोठा धक्का मानला जात आहे.
त्यातच पंकजा मुंडे यांना भाजपाकडून विधान परिषदेसाठी डावलण्यात आल्यामुळे राज्यभरातील मुंडे समर्थकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. याचे तीव्र पडसाद सोशल मीडिया उमटत आहेत मुंडे समर्थकांकडून भाजपा नेत्यांवर टीका केली जात आहे. गंगाखेड तालुक्यातील वंजारी समाज मात्र चांगलाच आक्रमक झाला आहे.
पंकजा मुंडे यांना विधान परिषद उमेदवारी डावलल्याच्या निषेधार्थ गंगाखेड तालुक्यात ‘कमळ चिन्ह हद्दपार करणार’ अशी पोस्ट व्हायरल केली होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्यात भाजपाची सर्वाधिक ताकद असलेल्या गंगाखेड तालुक्यामध्ये पक्षाला फटका बसणार असल्याचे दिसून येत आहे. तर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर सातत्याने पक्षाकडून अन्याय केला जात असल्याचे गंगाखेड पंचायत समितीच्या सभापती छायाताई मुंजाराम मुंडे यांनी सांगितले आहे.
‘पंकजा मुंडेंच्या उमेदवारीसाठी देवेंद्र फडणवीस आणि आम्ही खूप प्रयत्न केले, पण…’
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पंकजा मुंडे यांना का डावलण्यात आले, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की,आमच्या पार्टीमध्ये आम्ही सगळी कोरी पाकीटं असतो. जो पत्ता लिहील तो जात असतो. त्यामुळे राजकारणात काम करणारी व्यक्ती आणि त्याच्या चाहत्यांनी इच्छा व्यक्त करायची असते. पण निर्णय हा संघटना करते. विधानपरिषद, विधानसभा, लोकसभा, राज्यसभा हे निर्णय केंद्र सरकार घेते. केंद्राने घेतलेला निर्णय हा सर्वांनी शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून मान्य करायचा असतो. पंकजा ताईंची उमेदवारी व्हावी, यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासह आम्ही सगळ्यांनी खूप प्रयत्न केले. पण केंद्राने काहीतरी भविष्यातील विचार केला असेल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.