कोल्हापूर : राज्यसभेसाठी शिवसेना आणि भाजपने कोल्हापुरातील नेत्यांना उमेदवारी देत दक्षिण महाराष्ट्राला संधी दिल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षानेही चंद्रकांत हंडोरे आणि रामराजे निंबाळकरांना उमेदवारी दिल्याने या परिसराला प्रतिनिधित्व मिळणार हे स्पष्ट झालं आहे. हंडोरे हे मुंबईत असले तरी ते मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.

राज्यसभेसाठी संभाजीराजे छत्रपती यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा झाली होती. त्यामुळे दक्षिण महाराष्ट्र विशेषत: कोल्हापूरला संधी मिळणार का, अशी चर्चा सुरू असतानाच अचानक शिवसेनेने जिल्हाप्रमुख संजय पवार यांची उमेदवारी जाहीर केली. त्या पाठोपाठ भाजपने धनंजय महाडिक यांना संधी दिली. यामुळे सध्या कोल्हापूरच्या या दोन पैलवानांमध्ये राजकीय कुस्ती रंगली आहे. दोघांपैकी कुणीही निवडून आले तरी खासदार मात्र कोल्हापूरचाच होणार आहे. यामुळे राज्यसभेत दक्षिण महाराष्ट्राला प्रतिनिधीत्व मिळणार आहे.

‘पंकजाताई नाहीतर भाजपा नाही, तालुक्यातून कमळ हद्दपार करणार’; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

राज्यसभेच्या रणांगणात चुरस निर्माण झाली असतानाच विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली. सर्वच पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. भाजप आणि शिवसेनेने जाहीर केलेल्या यादीत दक्षिण महाराष्ट्राला संधी दिली नसल्याचे स्पष्ट होते. सेनेने सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे व प्रसाद लाड यांना विधानपरिषदेवर पाठवण्याचे निश्चित केले आहे. यातील एकही उमेदवार कोल्हापूर, सांगली अथवा सातारा जिल्ह्यातील नाही. यामुळे या दोन्ही पक्षांनी राज्यसभेला संधी देताना विधानपरिषदेला मात्र दक्षिण महाराष्ट्राकडे प्रतिनिधित्व देताना दुर्लक्ष केल्याचे दिसते.

दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मात्र या भागातील नेत्यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीने विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकरांना उमेदवारी देत सातारा जिल्ह्याला या पक्षाने प्रतिनिधित्व दिले आहे. काँग्रेसने चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देताना दलित समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. हंडोरे हे सध्या मुंबईत असले तरी ते कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील आहेत. यामुळे त्यांच्या रूपाने कोल्हापूरला विधानपरिषदेत संधी मिळणार आहेत. सध्या विधानपरिषदेत कोल्हापूरचे दोन आमदार आहेत. त्यामध्ये पालकमंत्री सतेज पाटील व जयंत आसगावकर यांचा समावेश आहे. आता हंडोरे यांच्या रूपाने तिसरे आमदार जिल्ह्याला मिळणार आहेत. या निवडणुकीत सांगली जिल्ह्याला मात्र उमेदवारी मिळालेली नाही.

राज्यसभा निवडणुकीच्या विजयाचं गणित धनंजय महाडिक यांनी स्पष्टच सांगितलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here