बुधवारी बारावीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये निखिलला ५७ टक्के गुण मिळाले होते. याचा आनंद व्यक्त करण्यासाठी निखिल निकाल लागल्याच्याच दिवशी तीन मित्रांसह माडगी येथील वैनगंगा नदी पात्राजवळ सेलिब्रेशन करायला गेला. नदी दिसताच पाण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी पोहण्याचा मनोसोक्त आनंद घेतला. दरम्यान, निखिलचा तोल जाऊन तो नदी पात्रात बुडाला.
यावेळी त्याच्या दोन मित्रांनी आरडाओरडा करत मदतीसाठी नागरिकांना पाचारण केलं. मात्र, तोपर्यंत निखिलचा मृतदेह वाहून गेला. घटनेची माहिती तुमसर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतक निखिल याचा नदीपात्रात शोध सुरु केला असता सुमारे एक ते दीड तासानंतर त्याचा मृतदेह आढळला. त्याच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी तुमसर उपजिल्हा रुग्णालय इथं पाठविण्यात आला आहे. पुढील तपास तुमसर पोलीस करीत आहे. १२ वीच्या परीक्षेत पास झालेला निखिल मात्र दुर्देवाने जीवनाच्या परिक्षेत नापास झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.