मुंबईत महाविकास आघाडीने केलेल्या शक्तीप्रदर्शनानंतर गुरुवारी ताज हॉटेलमध्ये भाजप आमदारांची बैठक झाली. या बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आमदारांना मार्गदर्शन केले. यावेळी भाजप आमदारांना राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. आमदारांनी फोनवर बोलताना काळजी घ्यावी. तसेच राज्यसभेची निवडणूक होईपर्यंत मुंबई सोडून बाहेर जाऊ नये, अशी सूचना भाजपच्या प्रमुख नेत्यांनी आमदारांना केल्याचे समजते.
दरम्यान, भाजप आणि महाविकास आघाडीकडून गुरुवारी आपापल्या आमदारांसाठी राज्यसभा निवडणुकीत कशाप्रकारे मतदान करावे, याची कार्यशाळा घेतली जाणार आहे. ताज हॉटेलमध्ये भाजपचे राज्यसभा निवडणुकीचे प्रभारी अश्विनीकुमार वैष्णव आज उपस्थित राहतील. यावेळी भाजप आमदारांची राज्यसभा निवडणुकीतील मतदानाची मॉकड्रील घेतली जाईल. यावेळी देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. करोनाची लागण झाल्यामुळे देवेंद्र फडणवीस गेल्या काही दिवसांपासून होम क्वारंटाईन होते. मात्र, आता त्यांची प्रकृती सुधारल्याची माहिती आहे. तर ट्रायडंट हॉटेलमध्ये शिवसेना आमदारांची कार्यशाळा घेतली जाणार आहे.
पक्षीय बलाबल आणि राज्यसभेचं गणित
विधानसभेतलं भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं बलाबल पाहता सहाव्या जागेसाठी चुरस आहे. भाजपचे दोन, तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी होईल, इतकं संख्याबळ आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेनेनं संजय पवार आणि भाजपनं धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही नेते कोल्हापूरचे आहेत.