२००८ साली रेल्वे भरती प्रक्रियेत परप्रांतीयांना झुकते माप देण्याच्या मुद्द्यावरुन कल्याण येथे मनसैनिकांनी तोडफोड केली होती. त्यानंतर कल्याण पोलिसांनी राज ठाकरे यांच्यावर अटकेची कारवाई केली होती. या कारवाईचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. सांगली जिल्ह्यातही राज यांच्या अटकेविरोधात मनसेकडून आंदोलन करण्यात आले होते. शिराळा तालुक्यातल्या शेंडगेवाडी इथं मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनातही तोडफोडीचा प्रकार घडला होता.
या प्रकरणी शिराळा पोलीस ठाण्यात तानाजी सावंत यांच्यासह मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल झाला होता. तसंच या गुन्ह्याप्रकरणी २००९ साली राज ठाकरे यांनी शिराळा न्यायालयामध्ये हजर राहून जामीन देखील घेतला होता. मात्र त्यानंतर सदर खटल्याच्या सुनावणी तारखांना वारंवार गैरहजर राहिल्याचा ठपका ठेवत शिराळा न्यायालयाने राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले होते.
परळी न्यायालयाकडूनही राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट
काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांच्याविरोधात बीडमधील परळी न्यायालयानेही अटक वॉरंट जारी केले होते. २००८ साली राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ परळीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी परिवहन महामंडळाच्या बसेसवर दगडफेक केली होती. याप्रकरणात गुन्हा दाखल होऊन हे प्रकरण न्यायालयात गेले होते. यानंतर राज ठाकरे यांना अनेकदा न्यायालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. परंतु, राज ठाकरे एकाही सुनावणीला हजर राहिले नव्हते. जामीन देऊनही सतत तारखेला गैरहजर राहिल्याने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.
मास्क लावत नव्हते त्यांना दुसऱ्यांदा करोना झाला, राज ठाकरेंना अजितदादांचा टोला