यावेळी एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेची उमेदवारी मिळाल्याबद्दल शरद पवार आणि अजित पवार यांचे आभार मानले. मला अडगळीत टाकण्यात आलं होतं, अडचणीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसने मला साथ दिली. त्यामुळे आता विधानपरिषदेची निवडणूक जिंकल्यानंतर माझं राजकीय पुनर्वसन करणाऱ्यांशी प्राामाणिक राहणे, ही माझी भूमिका असेल. काही दिवसांपूर्वी लोक चर्चा करत होते की, ‘एकनाथ खडसे संपले’, ‘ते आता विधिमंडळात परत पाय ठेवत नाहीत’. मात्र, शरद पवार आणि अजित पवार यांनी विधानपरिषदेची उमेदवारी देऊन माझ्यावर विश्वास दाखवला. त्यासाठी मी या दोघांचाही ऋणी असल्याचे खडसे यांनी म्हटले.
एकनाथ खडसे यांनी भाजपला फटकारले
पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी नाकारल्याच्या मुद्द्यावरुन एकनाथ खडसे यांनी भाजपला चांगलेच फटकारले. कोणाला उमेदवारी द्यायची हा भाजपचा अंतर्गत प्रश्न असला तरी पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय झाला आहे. एकेकाळी भाजपपासून महाराष्ट्रातील बहुजन समाज दूर होता. त्या काळात फरांदे सर, अण्णा डांगे, एकनाथ खडसे, भाऊसाहेब फुंडकर आणि प्रमोद महाजन या नेत्यांनी भाजपचा चेहरा बदलला.
महाराष्ट्रात भाजपचे आज जे स्थान आहे, त्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांनी संघर्ष करून महाराष्ट्रात भाजपचा पाया रुजवला, पक्षाचा विस्तार केला. अशा परिस्थितीत आज पंकजा मुंडे यांना भाजपने तिकीट नाकारणं हे दुर्दैवी आणि अन्यायकारक आहे. ज्यांनी पक्षासाठी काहीच केले नाही, ज्यांचं काही योगदान नाही, ते अचानक येतात आणि पदावर बसतात. ज्यांनी उभं आयुष्य पक्षासाठी खर्ची केलं, त्यांना बाजूला ठेवले जाते. विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी पंकजा मुंडे यांचा विचार झाला पाहिजे होता, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले.
पंकजा मुंडेंना डावलून लॉटरी लागली त्या उमा खापरे कोण आहेत?