satara accident news: नव्या कारने देवदर्शनासाठी जाताना कुटुंबावर काळाचा घाला; वडील-चुलते ठार; आईसह मुलगा गंभीर – accident while going for devdarshan in a new car 2 passed away mother and son were injured
सातारा : माण तालुक्यातील एका कुटुंबातील काही सदस्य चारचाकी वाहनातून देवदर्शनासाठी जाताना कवठेमहांकाळ येथे भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण ठार झाले असून आई आणि मुलगा गंभीर जखमी झाला आहे. कारने रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक दिल्याने सोमवारी दुपारी हा अपघात झाल्याची माहिती आहे.
आपल्याकडेही चारचाकी गाडी असावी, असं सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांचं स्वपत्न असतं. माण तालुक्यातील कळसकरवाडी येथील स्वप्नील पवार याने काही दिवसांपूर्वीच नवीकोरी कार खरेदी केली होती. सोमवारी या गाडीचं पूजन करण्यात आलं आणि सप्नील आपल्या आई-वडील आणि चुलत्यांसह देवदर्शनासाठी निघाला. पवार कुटुंबाने सर्वात आधी तुळजापूर येथे भवानीमातेचे आणि पंढरपूरला विठुरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर सर्वजण ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी निघाले. मात्र कवठेमहांकाळ येथे पोहोचल्यानंतर चालक स्वप्नीलचं नियंत्रण सुटलं आणि कार रस्त्यात उभ्या असलेल्या मालवाहू ट्रकला धडकली. या भीषण अपघातात स्वप्नील पवार याचे वडील आनंदराव शिवराम पवार (वय ६८) यांचा जागीच मृत्यू झाला. तसंच जखमी झालेले चुलते माणिक साहेबराव पवार (वय ५८) यांनी रुग्णालयात नेत असताना वाटेत प्राण सोडले. या अपघात स्वप्नील आणि त्याची आईदेखील गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.