Pune News: पुणेकर, पुणेकारांच्या गोष्टी, त्यांनी केलेले अपमान, त्यांच्या भन्नाट करामती आणि त्यासोबतच त्यांनी केलेले कौतुकास्पद आणि धैर्यवान कार्य याचे किस्से आपण कायमच ऐकतो. पुणेकरांनाचं असल्या भन्नाट कल्पना सुचू शकतात, असंही अनेकजण म्हणतात. मात्र हे तितकंच खरं देखील आहे. वयाच्या 50व्या वाढदिवसाला आपल्यातले अनेकजण कुटुंबीयांना घेऊन बाहेर जेवण किंवा फिरायला जातात मात्र पुण्यातल्या संगीतप्रेमी शिवाजी ताठे यांनी त्यांच्या वाढदिवसाचा प्लॅन भन्नाट आखला होता. लहानपणापासून संगीताची आवड असल्याने आपला 50 वा वाढदिवस हिन्दी, मराठी 50 गाणे सलग गायचा प्लॅन आखला आणि काल (9जून)ला त्यांनी तो प्लॅन यशस्वीसुद्धा केला.
शिवाजी ताठे एका कंपनीत जनरल मॅनेजर आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक प्रकारचे गाण्याचे कार्यक्रम केले आहेत मात्र सलग 50 गाणी गाण्याचा प्रयोग ते पहिल्यांदाच करणार आहेत. शिवाजी ताठे यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. मात्र आई-वडिल शेतकरी असल्याने त्यांना गायनाकडे फार लक्ष देता आलं नाही. त्यानंतरचे काही वर्ष शिक्षण, नोकरी आणि कुटूंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात गेलं. त्यामुळे गाण्याची हवी तशी आवड त्यांना जपता आली नाही. मात्र आवड असेल तर वयाच्या 50 व्या वर्षी देखील सवड मिळू शकते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे शिवाजी ताठे.
कोरोनामध्ये मित्र गेला मात्र शिवाजींनी दोस्ती निभावली
संगीताच्या आवडीमुळे काही वर्षांपुर्वी त्यांनी कलांकूर नावाची संगीत संस्था स्थापन केली. आपले नातेवाईक आणि सहकाऱ्यांच्यामध्ये मैफिल रंगवायला सुरुवात केली. यात त्यांच्या कुटूंबीयांची त्यांना उत्तम साथ मिळाली. त्यातच नितिन मंडवाले नावाच्या आवडत्या मित्राने त्यांना ही Non Stop 50/50 ची कल्पना सुचवली होती. आता 50व्या वाढदिवसानिमित्त असा भन्नाट कार्यक्रम करायचा हे या दोन्ही मित्रांचं ठरलं होतं. मात्र मध्येच सगळ्या जगाला कोरोनाने विळखा घातला. त्यात कोरोनाने नितिन यांचं दुर्दैवाने निधन झालं. त्यांच्या सखासोबती असलेल्या नितिन यांची ईच्छा अपूरी रहायला नको म्हणूनस त्यांच्या मृत्यूनंतरही यारी दोस्ती निभवण्याचं काम शिवाजी यांनी हाती घेतलं आणि आपल्या वाढदिवसानिमित्त आणि नितिन यांच्या स्मरनार्थ हा कार्यक्रम आयोजित केला.
कुटुंबीयांची साथ
शिवाजी ताठे यांचं त्रिकोनी कुटूंब आहे. पत्नी मंजुषा ताठे आणि मुलगा आदित्य ताठे. भन्नाट विचार करणाऱ्या माणसाला जर कुटुंबीयांची साथ मिळाली तर त्याची स्वप्न पुर्ण होतात. शिवाजी यांना कुटुंबीयांची आणि नातेवाईकांचा भक्कम पाठिंबा आहे. त्यांचा मुलगा देखील कला क्षेत्रात काम करतो. पुण्यात होणाऱ्या महत्वाच्या एकांकीका स्पर्धेत त्याने अनेक बक्षिसं जिंकली आहे.