पुणे टाइम्स टीम

अभिनय प्रवास…अभिनयाच्या प्रवासाबद्दल माधुरी म्हणाली, ‘आपल्यातली कौशल्यं, सुप्त गुण इतरांना आधी दिसतात. एमबीए करेपर्यंत या क्षेत्रात येईन हे मला माहीत नव्हतं. २०१०-११ मध्ये ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा कार्यक्रम केलं. त्यानंतरही या क्षेत्रात येईल असं वाटलं नव्हतं. उच्च शिक्षण घ्यायचं हा ध्यास होता, कारण पालिकेच्या शाळेत शिकलेले, त्यात घरी बारावीपुढं कुणी शिकलेलं नाही त्यामुळे शिक्षणाची ओढ अधिक होती. त्यानंतर एका शाळेत मी लेक्चरर म्हणून काम केलं. ‘अप्सरा आली’चं ऑडिशन झालं आणि रिअॅलिटी शोमध्ये आले. तिथं जिंकल्यानंतर आता काय करू हा प्रश्न होता, तणाव होता. घरी चर्चा केल्यावर मित्र-शुभचिंतक आणि मला मोठ्या पडद्यावर पाहण्याचं आईचं स्वप्न कळलं तेव्हा माझी वाटचाल सुरू झाली.

सातारा-पुणे-मुंबई…करिअरमधल्या आव्हानांचा सामना करण्याबद्दत माधुरी म्हणते, ‘अभ्यासू किडा व्हायचं नाही; पण शाळा-कॉलेजमध्ये चांगले मार्क मिळवत होते. त्यापलीकडं आपली दखल घेतली जाईल, असं काय करावं हे मनात होतं. खेळ, चित्रकला, नृत्य या सगळ्यांत आपण चमकावं हा विचार कायम असे. त्यात मी टॉमबॉईश होते. माझा घरातला वावरही चौकटीपलीकडचा होता. मुलगी म्हणून अमुक करू नको हा संस्कार माझ्यावर कधी झाला नाही. सावळ्या मुलीला खूप गोष्टी सहन कराव्या लागतात असं तेव्हा वाटायचं. कारण गॅगरिंगमध्ये सुंदर मुलींना पुढं उभं केलं जायचं. कृष्णाचा रंग सावळा, हे ध्यानी ठेव असं आईनं एकदा सांगितलं. पुढं कॉलेजमध्ये पुन्हा या न्यूनगंडानं डोकं वर काढलं. जेव्हा २०१६ मध्ये मी मिस सातारा ही स्पर्धा जिंकले तेव्हा, ‘तुझा रंगमंचावरचा वावर सुंदर, तुझे फिचर्स छान असं परीक्षकांनी सांगितलं तेव्हा ही मानसिकता बदलली.’

अभिनयच बोलणारबॉडी शेमिंग आणि नाकारलं जाण्याबद्दल माधुरी म्हणते, ‘दहा वर्षांपूर्वी एका रिअॅलिटी शोमध्ये निवडप्रक्रियेत माझं सादरीकरण आवडूनही मला बाद केलं गेलं. चांगलं नृत्य करूनही तू डावलली गेलीस, कारण त्या मुली अधिक सुंदर आहेत असं मला तिथल्या एका व्यक्तीनं सांगितलं. इंडस्ट्रीत हेच पाहिलं जातं, तुम्ही ऑनस्क्रीन कशा दिसता, प्रत्यक्षात कशा. ऑडिशनला अनेकदा तू छान अभिनय करतेस असं सांगतात आणि पुढं तुमच्याशी संपर्कच साधत नाहीत, तेव्हा खच्चीकरण व्हायला सुरुवात होते. या अनुभवांनंतर सुंदर मुलीची भूमिका करणार नाही हे मी आधी ठरवलं. जिथं आपल्याला अभिनय जपता येईल अशा भूमिका करायच्या. शारीरिक सौंदर्य हे कायम नाही, तर अभिनय ही उरणारी गोष्ट आहे. अभिनयानं आपली निवड व्हावी, दिसण्यातून नाही हे मी ठामपणे ठरवलं आहे.

मी रिलस्टार नाहीरिल्स हा अभिनय नाही आणि त्यावर टीका होते, त्याबद्दल माधुरी म्हणते, ‘मला रिलस्टार म्हटलं, की राग येतो. आतला कलावंत दुखावला जातो. टिकटॉक आलं तिथून माधुरीला प्रसिद्धी मिळाली हे खरं असलं, तरी त्यानंतरही कामं मिळाली नाहीत हे वास्तव आहे. आता माध्यमं बदलली आहेत. कलाकार कुठं दिसतो त्यावर प्रेक्षकांची दाद ठरते. मला माझ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला जे माध्यमरूपी रस्ते आहेत ते मी निवडले. यंगस्टर्सना एक सांगावं वाटतं, की ते यात वाहत जात आहेत. आपली कला इतरांच्या लाइक्सवर ठरत नाही. प्रेक्षक समोरून देतो तीच खरी दाद. मोबाइलचा पडदा किंवा रिल्सवर आपण फेमस झालो, की तुम्ही कलाकार झाला असं होत नाही. हे मनोरंजन आहे, तुम्ही कलावंत झालात, यावर शिक्कामोर्तब नाही. हा केवळ एक बदल आहे आणि मी तो स्विकारला आहे, मी त्यातून पुढं आलेले नाही. त्याच्या चांगल्या-वाईट बाजू ओळखून तिथं वावरणं मला महत्त्वाचं वाटतं.’

आवाज आणि बाल्ड लूक‘रानबाजार’ सीरीजमधल्या भूमिकेबद्दल माधुरी म्हणाली, ‘छोट्या कलाकाराला मोठी संधी मिळणं फार महत्त्वाचं असतं. मला अभिजित पानसे यांच्याकडून अशी संधी मिळाली. त्यांनी माझे व्हिडिओ पाहिले होते. पानसेसरांचा मेसेज आल्यावर मी पुण्यात त्यांना भेटले. सोशल मीडियाची ही चांगली बाजू आहे. मला त्यांनी राजकारणातल्या स्त्रीची भूमिका करायची आहेस, असं सांगितलं आणि कथा ऐकवली. भूमिकेसाठी शिव्या द्यायच्या आहेत हे कळल्यावर मी अवाक् झाले. सोशल मीडियावरच्या मुलीला महत्त्वाची भूमिका देतोस अशी अनेकांची प्रतिक्रिया असूनही त्यांनी ही भूमिका माझ्यावर विश्वास ठेवून दिली, त्यासाठी मी ऋणी आहे. या संधीनंतरही माधुरी प्रेक्षकांसमोर कलावंत म्हणूनच येत राहील.’

छंद ः शिक्षण, संवाद, स्वयंपाक

सौंदर्याची व्याख्या ः तुमचा आत्मविश्वासपूर्ण वावर

नृत्याची आवड ः बाबांकडून वारसा, ते उत्तम नृत्य करतात

सोशल मीडिया ः मनोरंजन आणि सादरीकरणाचं हे माध्यम

आगामी काळात ः मुक्ता आर्ट्सच्या लंडन मिसळ या सिनेमासह, मुंबईचा फौजदार, दिशाभूल, फांजर हे सिनेमे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here