औरंगाबाद : राज्यात २० जून रोजी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी न देऊन भाजपकडून पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना डावलण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा यांचे समर्थक आक्रमक झाले असून या समर्थकांकडून औरंगाबादमधील भाजप कार्यालयाबाहेर आक्रमक आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात घोषणाबाजी करत त्यांनीच पंकजा मुंडेंवर अन्याय केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला.

भाजपने बुधवारी विधानपरिषद निवडणुकीसाठी पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. मात्र या यादीत पंकजा मुंडे यांना स्थान देण्यात आलं नाही. विधानपरिषदेत संधी मिळाल्यास मी चांगलं काम करून दाखवेन, असं म्हणत पंकजा मुंडेंनी अप्रत्यक्षरीत्या उमेदवारीची अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र मुंडे यांच्याऐवजी भाजप नेतृत्वाने इतर पक्षातून भाजपवासी झालेल्या उमेदवारांवर विश्वास दाखवला. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीर पंकजा मुंडे यांच्या समर्थकांकडून विविध शहरांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पंकजा यांचे औरंगाबादमधील समर्थक तर थेट रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. भाजप कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

‘माझे वडील अयोध्येला गेले होते, पण उद्धव ठाकरेंनी अर्धीच स्टोरी सांगितली’

पंकजा मुंडे दोन दिवसानंतर भूमिका स्पष्ट करणार?

भाजपकडून वेळोवेळी डावलण्यात येत असल्याने पंकजा मुंडे या बंड करण्याचा निर्णय घेणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र पंकजा मुंडे यांनी सध्या तरी प्रतिक्रिया देणं टाळलं असून त्या दोन दिवसांनंतर या सगळ्या घडामोडींबाबत भाष्य करतील, असं सांगितलं जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here