लखनऊमध्ये पबजीवरून आईची हत्या
लखनऊमध्ये ऑनलाईन गेम खेळू न दिल्यानं १६ वर्षांच्या मुलानं स्वत:च्या आईची गोळी झाडून हत्या केली. तीन दिवस त्यानं आईचा मृतदेह लपवून ठेवला.त्यावेळी त्याची बहिण घरीच होती. दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी सकाळी बहिणीला घरात बंद करून मुलगा मित्राच्या घरी गेला. रात्री मित्राला घरी घेऊन आला. ऑनलाईन ऑर्डर करून त्यानं जेवण मागवलं. जेवल्यावर लॅपटॉपवर चित्रपट पाहिला.
हत्येच्या तीन दिवसांनंतर त्यानं आणखी एका मित्राला घरी राहायला बोलावलं. दरम्यान मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली होती. मित्राला याबद्दल समजू नये म्हणून मुलानं संपूर्ण घरात रुम फ्रेशनर स्प्रे केला. मंगळवारी सकाळी मित्र त्याच्या घरी गेला. यानंतर आरोपी खेळायला गेला. संध्याकाळपर्यंत दुर्गंध पसरू लागला. त्यानंतर मुलानं वडिलांना व्हिडीओ कॉल केला आणि घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री मोबाईलवर गेम खेळत असताना आईनं मुलाला रोखलं. त्यामुळे संतापलेल्या मुलानं मध्यरात्री २ वाजता आई झोपली असताना तिच्यावर गोळीबार केला.
अभ्यास न केल्यानं ५ वर्षांच्या मुलीला उन्ह्यात झोपवलं
दिल्लीतल्या खजुरी खास परिसरात एका आईनं तिच्या ५ वर्षांच्या लेकीला अतिशय अघोरी शिक्षा दिली. गृहपाठ न केल्यानं लेकीला उन्हानं तापलेल्या छतावर झोपवलं. तिचे हात-पाय बांधून ठेवले. लहान मुलगी रडत होती. आक्रोश करत होती. शेजारी राहणाऱ्यांनी घटनेचा व्हिडीओ काढला. पुढे हा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी आईविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुलीला अनेकदा समजावूनही ती अभ्यास करत नसल्यानं रागाच्या भरात तिला छतावर झोपवल्याचं आईनं पोलिसांना सांगितलं.
लुडो खेळणाऱ्या मुलाला वडिलांनी संपवलं
उत्तर प्रदेशच्या आझमगढमध्ये वडिलांनी मुलाची हत्या केली. मुलगा सतत लुडो खेळत असल्यानं वडील संतापले. त्यांनी मुलाची हत्या केली आणि मृतदेह नदीच्या किनाऱ्यावर पुरला. जितेंद्र निषाद असं आरोपी पित्याचं नाव आहे. जितेंद्र यांनी ४ जूनला त्यांच्या एकुलत्या एका मुलाला मारहाण केली. जितेंद्र यांनी त्यांच्या ६ वर्षांच्या धर्मवीरला बेदम मारलं. त्यात त्याचा मृत्यू झाला.