Hingoli Rain News : सध्या राज्यातील वातावरणात बदल झाला आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. काल (बुधुवार) राज्यातील अनेक भागात वादळी पाऊस झाला. उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना तरी या पावसापासून दिलासा मिळत असला तरी शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या केळी उत्पादकांचे या पावसामुळं मोठं नुकसान झालं आहे. 500 हेक्टरवरील केळीच्या बागा या पावसामुळं जमीनदोस्त झाल्या आहेत.

 
बुधुवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळं हिंगोली जिल्ह्यातील गिरगाव कुरुंदा यासह दहा ते बारा गावाच्या शेत शिवारातील केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कारण या भागातील केळी हे पीक प्रमुख पीक मानले जाते. कालच्या वादळी वाऱ्यामध्ये शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावला आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज वसमतचे तहसीलदार अरविंद बोळंगे आणि कृषी अधिकारी गोविंद कल्याणपाड यांनी स्वतः शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. पाचशे हेक्टर शेतजमिनीवरील केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. या शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले असल्याची माहिती वसमतचे तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी दिली आहे.

 

पुढच्या 48 तासात मान्सून कोकणात येणार

दरम्यान, पुढच्या 48 तासात मान्सून कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकणात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. कर्नाटकमध्ये अडखळलेली मान्सूनची गाडी अखेर कोकणात येणार आहे. दरम्यान, यंदा मान्सून लवकर येणाचा अंदाज वर्तवण्यात येत होता, मात्र, मान्सूनच्या आगमनासाठी थोडा उशीर झाल्याचे दिसत आहे. 

कोकणात मान्सूनसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाल्यानं ही शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. कारण, राज्यातील शेतकरी मान्सूनच्या आगमनाची वाट बघत आहेत. मान्सून कोकणात दाखल झाल्यानंतर पुढच्या 4 दिवसात मान्सून महाराष्ट्राच्या अन्य भागात पोहोचण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासात मान्सूनचे नैऋत्य वारे पुढे सरकरतील असे सांगण्यात आले आहे. तळकोकणात पुढच्या  48 तासात मान्सून दाखल होणार आहे. तर दुसऱ्या ठिकाणी काही ठिकाणी उष्णतेची लाट असल्याची स्थिती देखील आहे. पुढील चार दिवसात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, अचानक आलेल्या या पावसानं हिंगोली जिल्ह्यात केळी बागांचं मोठं नुकसान केलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here