अवनी परांजपे, पोदार कॉलेज

‘अरुंधती आणि आशुतोषच्या मैत्रीबद्दलच आता दाखवणार असाल तर मालिकेचं शीर्षक तरी बदला.’

‘अजून किती खेचणार मालिका… कार्तिकी-दीपिकाला खऱ्या आई-वडीलांविषयी सांगणार तरी कधी?’

‘आई-मायेचं कवच मालिका आता मुलगी सापडल्यावर तरी संपवा…’

या आणि अशा अनेक तिरकस प्रतिक्रिया रोजच्या रोज सोशल मीडियावर येत असतात. टेलीव्हिजन हे माध्यम अत्यंत प्रभावी माध्यम मानलं जातं. या माध्यमाचा प्रेक्षकवर्ग खूप मोठा आहे. बऱ्य़ाचदा मालिका रंजक करण्यासाठी त्यात नवनवीन ट्विस्ट्स आणले जातात. यामागे प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणं, मालिका अधिकाधिक मनोरंजक बनवणं हा हेतू असला तरी ही रंजक वळणं मालिकांना रटाळ बनवतात, अशी प्रेक्षकांमध्ये तक्रार असते.

अनेकदा एखाद्या फोटो, व्हिडीओ किंवा पोस्टमुळे कलाकार ट्रोल होत असतात. पण सध्या मालिकांच्या लेखकांना टारगेट केलं जातंय. काहीही काय लिहितात लेखक, खऱ्या आयुष्यात असं कुठे असतं, पाच मिनिटांच्या प्रसंगासाठी मालिकेचे दोन भाग गेले… अशा विविध प्रतिक्रिया आता थेट लेखकांपर्यंत पोहोचू लागल्या आहेत. पण मालिका या माध्यमाची गरज वेगळी आहे. त्याची मांडणी, सादरीकरण हे सिनेमा, वेब सीरिजपेक्षा काहीसं वेगळं असतं. त्यामुळे प्रेक्षकांच्या दृष्टीनं ‘लांबवलेला’ प्रसंग मालिकेसाठी मात्र ‘अचूक’ असतो, असं काही लेखकांचं म्हणणं आहे. तसंच मालिका हे न थांबणारं चक्र आहे. मालिकांमध्ये रोजच्या रोज काहीतरी ‘घडणं’ आवश्यक असतं. त्यामुळे तशा पद्धतीचं लेखन करणं ही गरज असल्याचंही काही लेखकांनी सांगितलं.

‘आई कुठे काय करते’, ‘मन उडू उडू झालं’, ‘माझी तुझी रेशीमगाठ’, ‘रंग माझा वेगळा’, ‘आई-मायेचं कवच’, ‘राजा-रानीची गं जोडी’ अशा काही मालिका सध्या मालिका लांबवणं, नाविन्य नसणं, अतिशयोक्ती दाखवणं, अतार्किक गोष्टी दाखवणं, अशा अनेक कारणांमुळे ट्रोल होत आहेत. प्रेक्षकांना मालिकांमधल्या खटकणाऱ्या गोष्टी ते सोशल मीडियावर बिनधास्त मांडत असतात. पण आता लेखकही याबद्दल व्यक्त होऊ लागले आहेत. पडद्यामागची त्यांची बाजूही ते मांडताना दिसत आहेत. यामुळे लेखक आणि प्रेक्षक यांच्यातील हा संवाद सध्या चर्चेचा विषय होऊ लागला आहे.

पूर्ण टीमची मेहनत
अनेकदा काही अडचणींमुळे मालिकांचे ट्रॅक बदलावे लागतात. अशा वेळी लेखकांवर टीका न करता, त्या बदलांकडे सकारात्मकदृष्ट्या बघावं. मी लिहीत असलेल्या मालिकांमधून काही ना काही सामाजिक संदेश देण्याचाच माझा प्रयत्न असतो. एखादा भाग लिहून तो प्रसारित होईपर्यंत सगळी टीम अहोरात्र मेहनत घेत असते. सध्याची तरुण पिढी मोठ्या प्रमाणात ओटीटीकडे (ओव्हर द टॉप) वळत असली तरीही प्रत्येक माध्यमाची गरज वेगळी असते. त्यामुळे माध्यमांची तुलना करत एकाला चांगलं आणि दुसऱ्याला वाईट असं प्रेक्षकांनी म्हणू नये. पटकथा लेखन ही एक आव्हानात्मक जबाबदारी असली तरीही ते काम करताना खूप मजा येते.
– स्वामी बाळ, लेखक, आई-मायेचं कवच
अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार! ‘रानबाजार’ सीरिजचे शेवटचे दोन भाग येणार या तारखेला
वैयक्तिक निर्णय
अनेक वेळा मला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं आहे. याकडे मी आता दुर्लक्ष करायला लागले आहे. करोनाकाळात अनेक कलाकारांना करोनाची लागण झाल्यानं कधीकधी एका रात्रीत पूर्ण कथानक बदलावं लागायचं. अशा वेळी प्रेक्षकांनी त्यामागची कारणं, परिस्थिती सगळं समजून घेणं गरजेचं आहे. मालिका सगळ्या वयोगटातल्या प्रेक्षकांना समोर ठेवून लिहिल्या जातात. मालिकेद्वारे सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले विषय दाखवायचा आमचा प्रयत्न असतो. मालिकांमधून चांगलं शिकायला मिळेल ते घ्यायचं की फक्त त्यातल्या चुका काढत राहायच्या; हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे.
– मुग्धा गोडबोले, लेखिका, आई कुठे काय करते

सकारात्मक दृष्टिकोन
ट्रोलिंगकडे फक्त नकारात्मक दृष्टिकोनातून बघू नये असं मला वाटतं. अनेकदा एखाद्या नकारात्मक पात्राचा आलेला संतापही त्या लेखकासाठी त्याच्या कामाची पोचपावती असते. ट्रोलिंगमधून कधी शाबासकी मिळते तर कधी खरंच आपल्याकडून झालेल्या छोट्या-मोठ्या चुका दाखवून दिल्या जातात. त्यामुळे ट्रोलिंगकडे पाहताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. इतर मालिकांमधली होळी, दिवाळी, लग्नापेक्षा आपल्या मालिकेतले हे सण-समारंभ कसे वेगळे दाखवता येतील हे पटकथा लिहिताना आव्हान असतं. पण हे नाविन्य मराठी मालिकांमध्ये सध्या बघायला मिळतंय. याचा प्रेक्षकांनीसुद्धा स्वीकार करावा.
– पल्लवी करकेरा, लेखिका, माझी तुझी रेशीमगाठ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here