गौरी नगरमध्ये एका घरात भाड्यानं वास्तव्यास असलेल्या अंतरसिंह उर्फ विशाल आणि शायना बी. यांनी दुसरा विवाह केला होता. अंतरसिंह मजुरी करतो आणि शायना गृहिणी आहे. लग्नानंतर शायना गर्भवती राहिली. पोटात असलेलं बाळ पहिल्या पतीचं असावं, असा संशय तिच्या मनात होता. त्यामुळे तिनं बाळ विकण्याचा निर्णय घेतला.
शायना आणि तिचा पती ज्या घरात भाड्यानं राहतात, त्या घराच्या मालकिणीनं बाळ विकण्यास मदत केली. मालकीण नेहा सूर्यवशीनं भागिरथपुरा येथे राहणाऱ्या पूजा वर्मा, नेहा वर्मा आणि नीलम वर्मा यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी मुलाचा सौदा देवास जिल्ह्यातल्या लीना नावाच्या महिलेशी केला. रुग्णालयात शायना प्रसूत झाल्याच्या १५ दिवसांनंतर बाळाला महिला दलालांच्या माध्यमातून लीना यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आलं.
हिरानगर पोलीस ठाण्याचे प्रभारी सतीश पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, देवासमधील लीना नावाच्या महिलेला ५.५० लाखांत बाळ विकण्यात आलं. सौदा करणाऱ्या महिलांनी यातून स्वत:चं कमिशन कापून घेतलं आणि बाळाच्या आई वडिलांना २ लाख ७० हजार रुपये दिले. यानंतर शायना आणि अंतरसिंहनं मिळालेल्या पैशातून टीव्ही, फ्रीज, कूलर, वॉशिंग मशीन, मोटारसायकल आणि अन्य वस्तू खरेदी केल्या.
एका समाजसेवी संस्थेनं पोलिसांकडे याबद्दलची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. पोलिसांनी बाळाला ताब्यात घेत त्याच्या आई वडिलांसह ८ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शायना, पूजा वर्मा, नेहा सूर्यवंशी, नेहा वर्मा, नीलम वर्मा यांना ताब्यात घेतलं आहे. अंतरसिंह आणि एक अन्य आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.