पैशांच्या वादावरून पाठीला दगड बांधून विहिरीत फेकलं
मिळालेल्या माहितीनुसार, पैशांवरून सुरू झालेला वाद जीवावर बेतल्याची घटना आज चंद्रपुरातील मोरवा गावात घडली. मोरवा गावात राहणाऱ्या प्रवीण घिवे या युवकासोबत गावातील काही युवकांनी पैशांवरून वाद घातला. त्यानंतर सदर वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. त्यानंतर, या युवकांनी जे केलं ते धक्कादायकच आहे. त्या तरूणांनी प्रवीणला मारहाण केली खंर. मात्र, ते युवक एवढ्यावर थांबले नाही. त्यांनी प्रवीणच्या पाठीला चक्क दगड बांधत त्याला विहिरीत फेकून दिले.
दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
या घटनेत प्रवीणचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पडोली पोलीस घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी मृतदेह विहिरीबाहेर काढत पंचनामा केला. पडोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी तपासाची चक्रे फिरवली असता या खून प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. मृतक प्रवीण यांचेकडून मारेकरी युवकांनी काही पैसे उसने घेतले होते. ते पैसे परत मागायला गेलेल्या प्रवीणचा मारेकऱ्यांनी काटा काढल्याचे सांगण्यात येत आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहे.