मुंबई: राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. सहाव्या जागेसाठी शिनसेना आणि भाजपनं उमेदवार दिले आहेत. ही जागा निवडून आणण्यासाठी दोन्ही पक्षांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. आपले आमदार फुटू नयेत म्हणून दोन्ही पक्षांनी हॉटेल पॉलिटिक्स सुरू केलं आहे. शिवसेनेचे आमदार ट्रायडंटमध्ये, तर भाजपचे आमदार ताज हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत.

ताजमध्ये असलेल्या भाजपच्या आमदारांसोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला. उद्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान होणार आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला फडणवीसांनी भाजप आमदारांना मार्गदर्शन केलं. आपले तिन्ही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास यावेळी फडणवीसांनी व्यक्त केला.
शरद पवार ‘मोठ्या निवडणुकी’च्या तयारीला लागले; सिल्व्हर ओकवर महत्त्वाची बैठक
राज्यसभेच्या निवडणुकीत कशा पद्धतीनं मतदान करायचं याचं प्रशिक्षण आज भाजप आमदारांना देण्यात आलं. यानंतर फडणवीसांनी आमदारांशी संवाद साधला. ठरलेल्या पॅटर्नप्रमाणे मतदान करा. तुमचं मत बाद होणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही फक्त मी सांगतो त्याप्रमाणे मतदान करा, अशा सूचना फडणवीसांनी आमदारांना केल्या.

अपक्षांसाठी मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न सुरू
तुमच्या मतदासंघातील कामांची यादी घेऊन वर्षावर या, असा मेसेज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून अपक्ष आमदारांना देण्यात आला आहे. या माध्यमातून मुख्यमंत्री अपक्ष आमदारांची मतं आपल्या बाजूनं करून घेतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अपक्षांची मतं भाजपकडे जाऊ नयेत यासाठी शिवसेनेनं व्यूहरचना आखली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मेसेजनंतर किती अपक्ष आमदार वर्षावर कामांची यादी घेऊन जातात, ते पाहणं महत्त्वाचं असेल.
राज्यसभा निवडणुकीचे गणित बदलले, आकडे फिरले; कोर्टाच्या निर्णयाचा मविआला फायदा?
लहान पक्षांना गळाला लावण्याचे प्रयत्न
एमआयएम, समाजवादी पक्ष, बहुजन विकास आघाडीची मतं मिळवण्यासाठीदेखील महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. पाठिंबा मागायचाच असेल, तर तो उघडपणे मागा. आमच्या मतदारसंघातील विकासकामं होत असतील, तर आम्ही पाठिंबा देऊ, अशी भूमिका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी घेतली आहे. त्यामुळे एमआयएम मविआला मदत करेल असं दिसत आहे.

एमआयएमची मतं काँग्रेस, राष्ट्रवादीला; त्यांची मतं सेनेला
एमआयएम आणि शिवसेना यांची विचारसरणी वेगळी आहे. त्यामुळे एमआयएमचा शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा मिळणं कठीण आहे. त्यामुळे एमआयएमची दोन मतं काँग्रेस, राष्ट्रवादीला मिळतील आणि काँग्रेस, राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक आमदार शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करेल, असा तोडगा निघत असल्याचं दिसत आहे. एमआयएमचा पाठिंबा मिळवण्यासाठी एक पत्रक काढलं जाईल. त्यात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचं नाव असेल. मात्र शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचं नाव नसेल. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेची अडचण होणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here