काही आमदार आजच्या; तसेच विधान परिषदेच्या मतदानासाठी काय व कसा ‘स्वतंत्र विचार’ करीत असतील, याची कल्पना करताना ‘अब्ज अब्ज मनी येते.’ या निमित्ताने बरीच कामे मार्गी लागतील. जादूचे पेटारे उघडतील आणि बंदही होतील. पुढच्या निवडणुकांची बेगमी करण्याची दूरदृष्टीही अनेक दाखवतील. राज्यसभा, विधान परिषद आणि राष्ट्रपतींची निवडणूक असे ‘पॅकेज डील’ किती जणांनी केले किंवा मागितले, हाही तपशील संसदीय लोकशाहीच्या उज्ज्वल वाटचालीसाठी कुणी तरी नोंदवून ठेवायला हवा. तो पुढे-मागे इतिहासात शिकवताही येईल. मोठ्या पक्षांनी आपल्या नेत्यांना झुलवत ठेवायचे, ऐन वेळी त्यांची तिकिटे कापायची आणि त्याच वेळी, या पक्षांना छोट्या पक्षांनी किंवा स्वनामधन्य आमदारांनी एकेका मतासाठी हैराण करायचे, असा काव्यगत न्याय सध्या अवतरला आहे. पंकजा मुंडे यांचे नाव आधी गाजणार आणि नंतर यादीत नसणार, हा तर प्रघातच पडला आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना आजच्या मतदानासाठी जामीन मिळालेला नाही. याचा अर्थ, परिषदेच्या मतदानातही ते नसण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक या भाजपच्या, तर महेंद्र दळवी या शिवसेनेच्या आमदारांना प्रकृती ठीक नसताना आज; तसेच विधान परिषदेसाठी मतदानाला यावे लागेल. सुभाष देसाई व दिवाकर रावते या ज्येष्ठांनी निवृत्ती घेतल्यानंतर शिवसेनेचे दोन नवे, राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे व रामराजे निंबाळकर, काँग्रेसचे भाई जगताप व चंद्रकांत हंडोरे हे सत्ताधारी महाविकास आघाडीचे सहाही उमेदवार विधान परिषदेत सुखरूप नेणे, हे मोठेच आव्हान आहे. आजच्या निकालानंतर सत्ताधारी आघाडी हे आव्हान कसे पेलणार, हे स्पष्ट होईल.
आजच्या मतदानाने निवडणुकांचा नवा हंगाम सुरू होतो आहे. राज्यसभा, परिषद आणि राष्ट्रपती या अप्रत्यक्ष निवडणुका असल्या, तरी त्यांच्या निकालांचा परिणाम लवकरच होणाऱ्या राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांवर होणार आहे. ही प्रक्रिया थेट महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांपर्यंत चालू राहणार आहे; त्यामुळेच सत्ताधारी आणि विरोधक आज आकाश-पाताळ एक करीत आहेत. लाखो रुपये खर्चून होणारे मुंबईतील पंचतारांकित हॉटेलांचे बुकिंग हे ‘दर्या में खसखस’ वाटावेत, असे आकडे आज नेत्यांच्या तोंडी फिरत आहेत. ‘विनेबिलिटी’, म्हणजे जिंकून येण्याची क्षमता हा एक अत्यंत विचित्र निकष काही वर्षांत जन्मला आणि रुळला आहे. प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेक गुणी माणसे पडू शकत नाही. अशांसाठी राज्यसभा आणि विधान परिषद ही वरिष्ठ सभागृहे आहेत. तेथे अनुभवी, ज्ञानी, विचारी माणसांनी जावे आणि ‘कनिष्ठ सभागृहां’समोर गंभीर कामकाजाचा आदर्श ठेवावा, अशी घटनाकारांची अपेक्षा होती. आज मात्र अनेक दशके काम करणारे निष्ठावंत, विचारी नेते अडगळीत आणि तोबरा व चंदा यांच्या थैल्या घेऊन फिरणाऱ्यांची चलती, अशी अवस्था आली आहे.