Vitthal Cooperative Sugar Factory Election : पंढरपूरचे वैभव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली आहे. यामुळं तेथील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची सत्ता मिळवण्यासाठी राजकीय नेत्यांमध्ये चढाओढ सुरु असल्याचं चित्र दिसत आहे. चार कारखान्यांचे चेअरमन असणाऱ्या अभिजित पाटील यांच्या गटानं गुरुवारी अभूतपूर्व शक्ती प्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
 

साडे सहाशे कोटी रुपयांची देणी

विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर सध्या साडे सहाशे कोटी रुपयांची देणी आहेत. त्यामुळे हा कारखाना सध्या अडचणीत सापडला आहे. हा कारखाना बंद असल्यामुळं या तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. आता हा कारखान्याची सत्ता मिळवण्यासाठी राजकीय नेत्यांनी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. पंढरपूर तालुक्यातील राजकराणाच्या दृष्टीनं विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा महत्वाचा मानला जातो. त्यामुळं राजकीय नेत्यांचं विठ्ठल कारखान्याकडं लक्ष आहे.

2 वर्षापासून कारखाना बंद

विठ्ठल कारखान्यावर सध्या दिवगंत भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांच्या गटाची सत्ता आहे. मात्र, एका गाळपाचे बिल देऊ न शकल्यानं तसेच कामगार आणि ऊस तोडणी मजुरांची देणी थकीत असल्यानं सत्ताधारी भालके गट बॅकफूटवर गेला आहे. अशात आर्थिक अडचणींमुळं आणि कारखान्यावर कोट्यवधी रुपयांचे कर्जे झाल्यानं हा कारखाना गेली 2 वर्षे सुरु झालेला नाही. यामुळं सध्या लागलेल्या विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत हा कारखाना जिंकण्यासाठी धाराशिव कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी कंबर कसली आहे. अभिजित पाटील यांच्याकडे उस्मानाबाद, नाशिक, नांदेड आणि सोलापूर या जिल्ह्यातील 4 कारखाने आहेत. यातील गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या सांगोला येथील कारखाना अवघ्या 35 दिवसात सुरु करुन त्यांनी साडेतीन लाख टन उसाचे गाळप करुन बिलाचे वाटप केलं आहे. त्यामुळं आता विठ्ठलच्या सभासदांना या तरुण कारखानदारांच्या बाबतीत विश्वास वाटू लागला आहे.

विठ्ठल परिवारात फूट

सध्या या कारखान्यासाठी सत्ताधारी भालके यांच्या विठ्ठल परिवारात 2 पॅनल पडल्यानं अभिजित पाटील यांना विठ्ठल जिंकण्याची अशा वाढली आहे. दरम्यान, गुरुवारी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करुन हजारो शेतकरी सभासदांसह पाटील यांनी बैलगाडीतून येऊन आपली व इतर सहकाऱ्यांची उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी केलेल्या शक्ती प्रदर्शनामुळं सत्ताधारी विठ्ठल परिवाराला मोठा हादरा मनाला जात आहे. विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीतून विधानसभेपर्यंतची वाट जाते, याची जाणीव असल्यानेच भगीरथ भालके आणि अभिजित पाटील हे टोकाच्या संघर्षासाठी सज्ज झाले आहेत.

दुसरीकडे कारखान्याचे संस्थापक असलेले दिवंगत आौदुबंर पाटील यांचे नातून युवराज पाटील तसेच राष्ट्रवादीचे युवक नेते गणेश पाटील आणि अॅड. दिपक पवार यांनीही त्यांचा एक गट विठ्ठलच्या निवडणुकीत उतरवला आहे. त्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळ या कारखान्याच्या निवडणुकीत चुरस वाढली आहे. मात्र, पंढरपूरचे सभासद कोणाच्या पारड्यात मतांचा कौल टाकतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here