डॉ. चंदनवाले यांच्याकडे यापूर्वी वैद्यकीय शिक्षण खात्याचा सहसंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. डॉ. चंदनवाले यांची जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी नियुक्ती काही महिन्यांपूर्वी झाली होती. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत राज्य सरकारने त्यांची पुन्हा पुण्यात बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात बदली केली.
दरम्यान, पुण्यात ‘करोना’चा संसर्ग सुरू झाला. त्यात ‘करोना’च्या संसर्गाने सर्वाधिक मृत्यू होत असल्याने गेल्या काही दिवसांपासून ससून रुग्णालयावर टीकेची झोड उठविली जात होती. मात्र, रुग्णालयात येणारा रुग्ण हा अंतिम टप्प्यात येत असल्याने चोवीस तासही रुग्णालयात उपचाराची संधी डॉक्टरांना मिळत नसल्याचे दिसून आले. या संदर्भात टीका सुरू राहिल्याच्या पार्श्वभूमीवर डॉ. चंदनवाले यांची बदली करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनीही ‘ससून’मध्ये होणाऱ्या उपचाराबाबत ‘प्रोटोकॉल’साठी समिती स्थापन केली. त्या समितीचे काम नुकतेच सुरू झाले आहे. त्यात डॉ. चंदनवाले यांची बदली झाली असून, आता त्यांचा कार्यभार उपअधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्याकडे सोपविला जाणार आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times