राष्ट्रवादीला इतर सहा आमदारांचा पाठिंबा असून त्यात देवेंद्र भुयार (स्वाभिमानी पक्ष- मोर्शी अमरावती), संजयमामा शिंदे (अपक्ष, निमगावा माडा), केशव जोरगेवार (अपक्ष, चंद्रपूर), शामसुंदर शिंदे (शेकाप, नांदेड), रईस शेख (सपा- भिवंडी), अबू आझमी (सपा- मानखुर्द) यांचा समावेश आहे. तसंच माकपने आपला पाठिंबा महाविकास आघाडीला जाहीर केला असल्यामुळे महाविकास आघाडीकडे विनोद भिवा निकोले यांचेही मत आहे.
राष्ट्रवादीनंतर शिवसेना आमदार मतदान करणार?
राष्ट्रवादीचे आमदार मतदान करून परतल्यानंतर शिवसेना आमदारांची बस विधानभवनाकडे रवाना होईल, अशी माहिती आहे.
धनंजय महाडिकांच्या हालचालींनी चुरस वाढली
लोकसभा, विधानपरिषद, विधानसभा आणि गोकुळ निवडणुकीत धनंजय महाडिक, महादेवराव महाडिक, अमल महाडिक आणि महाडिक गटाचा पराभव झाला होता. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत राज्यपातळीवर झालेल्या घडामोडींमुळे अमल महाडिक यांना माघार घ्यावी लागली. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत महाडिक यांचे भाचे सत्यजित कदम यांना पराभव स्वीकारावा लागला. गेल्या सहा वर्षात एका पाठोपाठ एक पराभव पचवावे लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवण्यासाठी महाडिक परिवाराने संपूर्ण ताकद झोकू दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीची चुरस वाढली असून महाडिक यांच्या प्रयत्नांना यश येते का, हे आज स्पष्ट होणार आहे.