राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपचे पोलिंग एजंट मतदानाच्या ठिकाणी बसले आहेत. त्यांच्याकडून मतदानप्रक्रियेवर लक्ष ठेवले जात आहे. भाजपचे पोलिंग असलेल्या पराग अळवणी यांनी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांचे मत बाद ठरवण्याची मागणी केली आहे. राज्यसभा निवडणुकीची मतपत्रिका भरल्यानंतर संबंधित आमदाराने आपल्या गटाच्या नेमून दिलेल्या प्रतिनिधीला आपली मतपत्रिका दाखवणे आवश्यक आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपली मतपात्रिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दाखवण्याऐवजी ती त्यांच्या हातात दिली. तर यशोमती ठाकूर यांनीही आपली मतपत्रिका नाना पटोले यांच्या हातात दिली. त्यामुळे या दोन्ही आमदारांची मतं बाद ठरवण्यात यावीत, अशी मागणी पराग अळवणी यांनी केली. त्यामुळे आता ही मतं बाद ठरवण्यात येणार का, हे पाहावे लागेल.
राज्यसभा निवडणुकीसाठी विधिमंडळात सकाळी ९ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. भाजप आणि महाविकास आघाडीच्या आमदारांकडून ठरलेल्या रणनीतीनुसार टप्याटप्प्याने मतदान केले जात आहे. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत २३८ आमदारांनी मतदान केले आहे. अजूनही शिवसेनेच्या बहुतांश आमदारांचे मतदान बाकी आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून आपापल्या उमेदवारांसाठी राखून ठेवण्यात आलेला निर्धारित कोटा वाढवण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठीची चुरस आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.
अनिल देशमुख यांना मतदानाची संधी मिळण्याची शक्यता खूपच धूसर
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना राज्यसभा निवडणुकीत मतदानाची संधी मिळण्याची शक्यता खूपच धूसर आहे. कारण कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या याचिकेवरच सुनावणी होऊन मतदानाच्या परवानगीबाबत अद्याप कोणताही सकारात्मक आदेश आलेला नाही. उच्च न्यायालयात प्रत्येक न्यायालयाला सुनावणीचे विषय मुख्य न्यायमूर्तींकडून नेमून दिलेले असतात. त्यानुसार हा विषय न्यायमूर्ती प्रकाश नाईक किंवा न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्याकडे सुनावणीसाठी जाऊ शकतो. मात्र, देशमुख यांच्याशी संबंधित प्रकरणांवर सुनावणी घेण्यास न्यायमूर्ती प्रकाश नाईक आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांनीही वैयक्तिक कारणांमुळे पूर्वी नकार दिला होता.