पुणे: मेळघाट व्याघ्र प्रकल्पामधून दुर्मीळ पांढऱ्या अस्वलाची नोंद करण्यात आली आहे. व्याघ्र प्रकल्पात राबविण्यात येणाऱ्या कॅमेरा ट्रॅप प्रोजेक्ट अंतर्गत या दुर्मीळ प्राण्याचे छायाचित्र टिपण्यात आले. त्यामुळे देशात प्रथमच अशा प्रकाराचे आढळल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

‘ल्युझिसम’ ही एक अशी परिस्थिती आहे, ज्यामध्ये शरीरातील रंगद्रव्याच्या थरांमध्ये आनुवंशिक बदल झाल्यामुळे प्राण्यांचे केस, त्वचा, पंख पांढरे होतात. परंतु, डोळे मात्र पांढरे होत नाहीत. भारतात आजवर अशा अनेक पांढऱ्या त्वचेच्या प्राण्यांची नोंद करण्यात आली आहे. मात्र, प्रथमच पांढऱ्या केसांच्या अस्वलाची नोंद झाल्याची शक्यता आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ४ मार्च रोजी सकाळी या पांढऱ्या अस्वल मादाची नोंद करण्यात आली. मेळघाटमध्ये वन विभाग आणि ‘भारतीय वन्यजीव संस्थान’ (डब्लूआयआय) कडून कॅमेरा ट्रॅपिंगचा कार्यक्रम सुरू आहे. ‘लाँग टर्म मॉनिटरिंग ऑफ टायगर बेअरिंग एरिया ऑफ विदर्भ, महाराष्ट्र’, असे या कार्यक्रमाचे नाव आहे. या कार्यक्रमाच्या चौथ्या टप्प्यांतर्गत कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले होते.

यामधील एका कॅमेरा ट्रॅपमध्ये ४ मार्च रोजी सकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास या पांढऱ्या मादीचे छायाचित्र कॅमेऱ्यात टिपले गेले. या मादीसोबत काळ्या रंगाच्या नर अस्वलाचे छायाचित्रही टिपण्यात आले आहे. यापूर्वी गुजरातमध्ये २०१६ साली तपकिरी रंगाच्या केसांच्या अस्वलाची नोंद करण्यात आली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here