rajya sabha election: चुरस वाढली! मविआची हक्काची २ मतं निकालात निघाली; अपक्षांच्या हाती विजयाची चावी? – rajya sabha election 2022 anil deshmukh and nawab malik unable to vote big blow for mva
मुंबई: राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी प्रयत्नशील असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांची संधी हुकल्यात जमा आहे. राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक (Nawab Malik) हे सध्या आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत. मतदानाला परवानगी मिळावी, यासाठी दोघांकडून न्यायालयात अर्जही करण्यात आले होते. मात्र, कायदेशीर पेचांमुळे या दोघांनाही राज्यसभेसाठी मतदान करण्याची परवानगी मिळण्याची शक्यता मावळली आहे.
नवाब मलिक यांनी शुक्रवारी सकाळी त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना याचिकेत दुरुस्ती करून योग्य त्या कोर्टात जाण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दुपारी विशेष पीएमएलए कोर्टात त्यांचा अर्ज सुनावणीसाठी आला. पण जेवणाची वेळ झाल्यामुळे न्यायमूर्ती भारती डांगरे न्यायासनावरून उठून गेल्या. दुपारी अडीचनंतर याबद्दलचं चित्र स्पष्ट झालं. पुरेसा वेळच उरला नसल्यानं आणि मतदानाचा कालावधी सायंकाळी ४ वाजेपर्यंतच असल्याने न्या. भारती डांगरे यांच्यासमोर पुन्हा जाऊन तातडीच्या सुनावणीसाठी विनंती न करण्याची भूमिका वकिलांनी घेतली. महाविकास आघाडीला दिलासा! आव्हाड, ठाकूर यांची मतं वैधच; भाजपचे आक्षेप फेटाळले अनिल देशमुख यांच्या याचिकेवर तर हायकोर्टात सुनावणीच झाली नाही. न्यायमूर्ती प्रकाश नाईक आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमोर सुनावणी होऊ शकणार नसल्याने देशमुख यांच्या वकिलांनी तातडीच्या सुनावणीसाठी प्रयत्नच केले नाहीत. हायकोर्टातील प्रयत्नही अपयशी ठरल्याने नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करता येणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
दोन मतं निकालात निघाली; आता अपक्षांवर मदार देशमुख, मलिक यांची मतं मविआसाठी हक्काची होती. मात्र आता त्यांना मतदान करता येणार नाही. यामुळे मविआचे चौथे उमेदवार असलेल्या संजय पवार यांचं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याकडे असलेली जादा मतं, अपक्ष आणि लहान पक्षांची साथ यामुळे पवारच विजयी होतील, असा विश्वास मविआकडून व्यक्त केला जात आहे.