अहमदनगर : कर्जत-जामखेडचे माजी मंत्री, माजी आमदार प्रा. राम शिंदे यांना ताकद देण्यासाठी नव्हे तर पुढील विधानसभा निवडणुकीत ते निवडून आले नसते, म्हणून त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांना लागावला आहे.

प्रा. शिंदे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिल्यानंतर त्यांना राजकीय ताकद देण्यासाठी पक्षाने हा निर्णय घेतल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे. हा दावा फाळके यांनी खोडून काढला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर फाळके यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

महाविकास आघाडी सरकारमध्ये काम करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी त्यांच्याकडे असलेल्या खात्यांच्या माध्यमातून जी कामे केली, त्याचा अहवाल या निमित्त पक्षातर्फे सादर करण्यात आला आहे. फाळके म्हणाले, ‘करोनाचा संकट काळात महाविकास आघाडीच्या सरकारने चांगले काम केले. मात्र, यासाठी ज्या खात्यांच्या माध्यमातून कामे झाली, ती महत्वाची खाती राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. इतर कोणत्याही पक्षाकडे नाही, असे नेतृत्व पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या रुपाने आम्हाला लाभले आहे. त्यामुळे सामाजिका कामांसोबतच निवडणुकांमध्येही पक्ष चांगली कामगिरी करीत आहे.’ असंही फाळके म्हणाले.

हेही वाचा :
राम शिंदे विधानपरिषदेवर, रोहित पवारांच्या विरोधात कोण? भाजपची पुढची रणनीती काय?
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही ताकदीने लढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सर्वच ठिकाणी महाविकास आघाडी कायम राहील, असे नाही. स्थानिक पातळीवरील परिस्थितीनुसार निर्णय घेतले जातील, तशी मुभा आम्हाला पक्षाने दिली आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत भाजपशी युती केली जाणार नाही. जिल्ह्यात पक्षाचे सहा आमदार आहेत. त्यामुळे आणखी एक मंत्रिपद मिळावे अशी मागणी आम्ही केली आहे. वर्धापन दिनाची भेट म्हणून आम्हाला आणखी एक मंत्रिपद मिळावे, अशी आमची अपेक्षा आहे, असेही फाळके म्हणाले.

हेही वाचा :
योगायोग, नियोजन की परिणाम? राम शिंदेंचा रोहित पवारांवर अप्रत्यक्ष बाण
सध्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ नगरला जास्त वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांनीच येथील पालकमंत्रीपदाची जबाबदारी नको, असे पक्षाला सांगितले आहे. त्यामुळे नवीन पालकमंत्री देण्याची आमची मागणी आहे. यासंबंधीचा निर्णय विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर होईल, अशी अपेक्षा आहे, असेही फाळके यांनी सांगितले. यावेळी कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहरजिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते, किसनराव लोटके, संजय सपकाळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :
चौंडीत उद्या अहिल्यादेवी जयंती उत्सव; राम शिंदे म्हणाले, ‘हा तर राष्ट्रवादीचा मेळावा’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here