भाजप आमदार शोभाराणी कुशवाहा यांनी क्रॉस व्होटिंग केल्यामुळे प्रमोद तिवारी यांचा विजय झाला. तिवारी दुसऱ्यांदा राज्यसभेत पोहोचले आहेत. भाजपच्या आमदारानं क्रॉस व्होटिंग केल्यामुळे भाजपच्या हायकमांडनं नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी नेतृत्त्वानं भाजप प्रदेशाध्यक्षांकडून अहवाल मागवला आहे. तर क्रॉस व्होटिंग करणाऱ्या शोभराणी कुशवाहा यांना निलंबित करण्यात आलं आहे. राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी ४१ मतांची गरज होती. प्रमोद तिवारी यांना ४१ मतं मिळाली.
काँग्रेसच्या रणदीप सुरजेवाला यांना ४३, मुकूल वासनिक यांना ४२ आणि प्रमोद तिवारी यांना ४१ मतं मिळाली. मात्र वासनिक यांना मिळालेल्या ४२ मतांपैकी १ मत बाद झालं. भाजपच्या घनश्याम तिवारी यांना ४३ मतं मिळाली. तर भाजपचा पाठिंबा असलेले अपक्ष आमदार डॉ. सुभाष चंद्रा यांना ३० मतं मिळाली. ते पराभूत झाले.
भाजप आमदार शोभाराणी यांच्या क्रॉस व्होटिंगमुळे विजयी झालेले प्रमोद तिवारी काँग्रेसमधील मोठे नेते आहेत. रामपूर विधानसभा मतदारसंघातून ते सलग ९ वेळा निवडून गेले आहेत. आता त्यांची कन्या आराधना मिश्रा रामपूरमधून विजयी झाली आहे. आराधना विधानसभेत पक्षाच्या गटनेत्या आहेत.