राज्यसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीने ट्रायडंट हॉटेलमध्ये अपक्ष आमदारांना सोबत घेऊन मोठे शक्तीप्रदर्शन केले होते. या कार्यक्रमाला जवळपास १२ अपक्ष आमदार उपस्थित होते. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीत यापैकी काही आमदारांची मतं भाजपच्या बाजूने वळाल्याचे स्पष्ट होत आहे. अपक्ष आमदार रवी राणा यांनीही असाच दावा केला होता. अपक्ष आमदार शरीराने महाविकास आघाडीसोबत असले तरी मनाने ते देवेंद्र फडणवीस आणि भाजपसोबत आहेत, असे रवी राणा यांनी म्हटले होते. राज्यसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर ही गोष्ट तंतोतंत खरी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेनेचे संजय पवार आणि धनंजय महाडिक यांच्यात लढत होती. पहिल्या फेरीत संजय पवार यांना ३३ मतं मिळाली होती. तर, धनंजय महाडिक यांना २७ मतं मिळाली आहेत. मात्र, दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे धनंजय महाडिक यांचा विजय झाला. या सगळ्यामागे देवेंद्र फडणवीस यांची कुशल रणनीती होती. गोवा विधानसभा निवडणुकीपाठोपाठ राज्यसभा निवडणुकीत खेचून आणलेल्या विजयामुळे देवेंद्र फडणवीस यांचे केंद्रातील वजन आणखीनच वाढणार आहे.
भाजपने महाविकास आघाडीची मतं फोडली
पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांना ४८ मतं मिळाली. तर, शिवसेनेचे संजय राऊत यांना ४१, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल पटेल यांना ४३ तर काँग्रेसचे इमरान प्रतापगढी यांना ४४ मतं मिळाली आहेत. महाविकास आघाडी सरकारसोबत असलेल्या आमदारांपैकी काही आमदारांना फोडण्यात भाजपला यश आलं आहे. भाजपच्या १०६ मतांशिवाय त्यांना अधिकची मतं १७ मिळवण्यात यश आलं आहे.