राज्यसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी पहाटे चार वाजता जाहीर झाला. यामध्ये भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांना पराभवाचा धक्का दिला. त्यामुळे आमचे चारही उमेदवार पहिल्या फेरीत निवडून येतील, हा महाविकास आघाडीचा दावा फोल ठरला. या पराभवाचे विश्लेषण करताना संजय राऊत यांनी म्हटले की, घोडेबाजारातील काही अपक्ष हे कोणाचेच नसतात. त्यांची मतं फुटली, पण आमच्यासोबत असणाऱ्या लहान पक्षांची मतं फुटली नाहीत. गडाख, यड्रावकर आणि बच्चू कडू या सर्वांनी महाविकास आघाडीलाच मतदान केले. त्यामुळे महाविकास आघाडीची सगली मतं जशीच्या तशी आम्हाला मिळाली आहेत. फक्त घोडेबाजारातील सहा-सात मतं न मिळाल्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला, असे संजय राऊत यांनी सांगितले.
आमचा उमेदवार विजयी होऊ शकला नाही. पण याचा अर्थ भाजपने दैदिप्यमान विजय मिळवला, असे होत नाही. संजय पवार यांना पहिल्या फेरीत ३३ मते मिळाली होती. तर धनंजय महाडिक यांना पहिल्या फेरीत २७ मते मिळाली होती. हादेखील संजय पवारांचा विजयच आहे. पण शेवटी राज्यसभेची निवडणूक प्रक्रिया अशी आहे की, त्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे धनंजय महाडिक विजयी ठरले. घोडेबाजारातील काही घोडे जास्त किंमतीला विकले गेल्याने संजय पवार यांचा पराभव झाला, असे राऊत यांनी सांगितले.
हा जनादेशाचा कौल नाही, हा तर घोडेबाजाराचा मॅन्डेट: राऊत
राज्यसभा निवडणुकीतील भाजपचा विजय हा जनादेशाचा कौल असल्याची बतावणी देवेंद्र फडणवीस करत आहेत. मात्र, हा जनादेशाचा कौल नव्हे तर घोडेबाजाराचा मॅन्डेट आहे, अशी टिप्पणी राऊत यांनी केली. मी फक्त ४२ मतांवर लढतो. मी ती रिस्क घेतली. त्यापैकी १ मत भाजपने बाद ठरवलं, असे संजय राऊत यांनी सांगितले.