Vidhanparishad Election 2022 | आजपर्यंतचा एकूण प्रघात पाहता राज्यसभा किंवा विधानपरिषद निवडणुकीत लहान पक्ष किंवा अपक्ष आमदार हे सहसा सत्ताधाऱ्यांच्या बाजूने मतदान करतात. मात्र, यंदाच्या राज्यसभा निवडणुकीने किमान महाराष्ट्रात तरी हा समज पार धुळीस मिळवला आहे. राज्याची सत्ता हातात असूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला अपक्षांना आपल्या बाजूने वळवता आले नाही, ही काहीशी चिंतेची बाब आहे. विधानपरिषद निवडणुकीतही अपक्षांनी हाच कित्ता गिरवल्यास महाविकास आघाडी सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे.

 

Devendra Uddhav 11
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे

हायलाइट्स:

  • विधानपरिषदेच्या १० जागांसाठी येत्या २० जूनला निवडणूक होत आहे
  • भाजपने राज्यसभा निवडणुकीप्रमाणे विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठीही आक्रमक पवित्र अवलंबिला आहे
  • भाजपने विधानपरिषदेच्या पाच जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत
मुंबई: राज्यसभेच्या सहाव्या जागेवर धनंजय महाडिक विजयी झाल्यामुळे या निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीवर सरशी साधली आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची एकत्र ताकद आणि सत्तेत असल्यामुळे आपसूकच अपक्षांचा सरकारच्या बाजूने असलेला ओढा हे दोन्ही फॅक्टर बाजूला सारत देवेंद्र फडणवीस यांनी अचूक नियोजन करून भाजपसाठी विजय खेचून आणला. भाजपच्या या विजयात अपक्ष आमदारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची धरली आहे. मात्र, आजपर्यंतचा एकूण प्रघात पाहता राज्यसभा किंवा विधानपरिषद निवडणुकीत लहान पक्ष किंवा अपक्ष आमदार हे सहसा सत्ताधाऱ्यांच्या बाजूने मतदान करतात. मात्र, यंदाच्या राज्यसभा निवडणुकीने किमान महाराष्ट्रात तरी हा समज पार धुळीस मिळवला आहे. राज्याची सत्ता हातात असूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला अपक्षांना आपल्या बाजूने वळवता आले नाही, ही काहीशी चिंतेची बाब आहे. विधानपरिषद निवडणुकीतही अपक्षांनी हाच कित्ता गिरवल्यास महाविकास आघाडी सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे विधानपरिषदेसाठी गुप्त पद्धतीने मतदान होते. त्यामुळे आता राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर मविआच्या गोटातील धाकधुक वाढली आहे. (MLC Elections 2022)

विधानपरिषदेच्या १० जागांसाठी येत्या २० जूनला निवडणूक होत आहे. राज्यातील पक्षीय संख्याबळानुसार यापैकी चार जागांवर भाजप, दोन जागांवर शिवसेना, दोन जागांवर राष्ट्रवादी आणि दोन जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून येणे अपेक्षित होते. मात्र, भाजपने राज्यसभा निवडणुकीप्रमाणे विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठीही आक्रमक पवित्र अवलंबिला आहे. काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तेव्हा फडणवीस यांनी महाविकास आघाडी समोर राज्यसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्या मोबदल्यात विधानपरिषदेची पाचवी जागा महाविकास आघाडीसाठी सोडण्याची तयारी फडणवीस यांनी दाखवली होती. मात्र, महाविकास आघाडीने हा प्रस्ताव मान्य केला नाही. त्यामुळे राज्यसभा आणि विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होणार नाही, हे स्पष्ट झाले.
विधानपरिषदेसाठी सदाभाऊ खोतांचीही उमेदवारी; मविआला धक्का देण्यासाठी भाजपची खेळी?
महाविकास आघाडीने राज्यसभा निवडणुकीत सेटलमेंट करण्यास नकार दिल्याने भाजपने विधानपरिषदेच्या पाच जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. एवढेच नव्हे तर सहाव्या जागेवर सदाभाऊ खोत यांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरवून त्यांच्या पाठिशी भाजपची ताकद उभी करण्यात आली आहे. या निवडणुकीतही आपले सर्व उमेदवार निवडून आणू, असा दावा भाजपचे नेते करत आहेत. विधानपरिषद निवडणुकीचा पॅटर्नही राज्यसभेप्रमाणेच आहे. या निवडणुकीतही पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या आधारे उमेदवारांची निवड होते. तसेच हे मतदान गुप्त पद्धतीने होते. राज्यसभा निवडणुकीच्यानिमित्ताने देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या खेळात आपला हातखंडा असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे आता फडणवीस यांनी राज्यसभेप्रमाणेच अचूक नियोजन करून विधानपरिषदेच्या पाचव्या आणि सहाव्या जागांवर चमत्कार करुन विजय खेचून आणला तर ती महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठी नामुष्की ठरेल. त्यामुळे आता महाविकास आघाडी राज्यसभा निवडणुकीत झालेल्या चुका विधानपरिषदेत सुधारणार का, हे पाहावे लागेल.
शिवसेनेकडून विधानपरिषदेत नव्या दमाच्या शिलेदारांना संधी, सुभाष देसाई म्हणाले…
विधानपरिषदेसाठी गुप्त पद्धतीने मतदान?

विधानपरिषद निवडणुकीसाठी होणारे गुप्त पद्धतीचे मतदान ही महाविकास आघाडी सरकारसाठी आणखी एक डोकेदुखी ठरू शकते. राज्यसभा निवडणुकीत केवळ अपक्षांना गुप्त पद्धतीने मतदान करण्याची मुभा होती. मात्र, विधानपरिषद निवडणुकीत प्रत्येक आमदाराचे मत गुप्त राहणार आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या गोटातील नाराज आमदारांची भाजपकडून फोडफोडी होण्याची दाट शक्यता आहे.

महाविकास आघाडी सरकारकडे सरकार स्थापन करतावेळी १६९ आमदारांचे संख्याबळ होते. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारचा पराभव झाला असला तरी त्यांनी आपापाल्या आमदारांची मतं राखली आहेत. मात्र, विधानपरिषदेत गुप्त पद्धतीने मतदान झाल्यास महाविकास आघाडीचे आमदार भाजपच्या उमेदवारांना मत देण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही महाविकास आघाडी सरकारसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. त्यामुळे विधान परिषद निवडणूक एका अर्थाने महाविकास आघाडी सरकराच्या स्थैर्याच्यादृष्टीने लिटमस टेस्ट ठरू शकते. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना खूपच कमी मतं पडली तर भाजपचं ‘ऑपरेशन लोटस’ पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : mahaviaks agahdi govt in tension before vidhanparishad election due to bjp victory in rajyasabha election 2022
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here