संगमनेर: करोनाच्या पार्शभूमीवर देशात सर्वत्र संचारबंदी व लॉकडाऊन असताना, भाजीपाल्याच्या नावाखाली संगमनेरातून मुंबईकडे गोमांसची वाहतूक सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ९ ते १४ एप्रिल दरम्यान पकडलेल्या तीन वाहनांतून सुमारे दोन टन गोवंशाचे मांस जप्त केले असून, वावी (नाशिक) पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नाशिक-अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे शिवारात नाकाबंदी दरम्यान ९ एर्प्रिलला संध्याकाळी सातच्या सुमारास अझरूद्दीन जमालुद्दीन शेख (वय २७), अहसान मोहम्मद कुरेशी (वय २२) (दोघेही रा. कुर्ला पूर्व, मुंबई) हे टेम्पोतून मुंबईकडे गोमांस घेऊन चालले होते. हा टेम्पो पोलिसांनी पकडून त्यातील पाच लाख ४८ हजार रुपये किंमतीचे ५ हजार ४८० किलो मांस व तीन लाख ५० हजार रूपयांचा टेम्पो असा एकूण आठ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अभय मुरलीधर ढाकणे यांनी फिर्याद दिली आहे.

तसंच १३ एप्रिलला रात्री पावणे अकराच्या सुमारास मोहमद युनूस याकुब कुरेशी (वय ४२), महेशकुमार जयदेवप्रसाद शर्मा (वय २६) (दोघेही रा. कुरेशी नगर, कुर्ला, मुंबई) हे मालवाहू ट्रकमधून मुंबईकडे मांस घेऊन जात होते. पोलिसांनी त्यांना पकडून ट्रकमधील दहा लाख रुपये किंमतीचे दहा हजार किलो मांस व दहा लाखांचा टेम्पो असा एकूण वीस लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस शिपाई विठ्ठल रामनाथ पवार यांनी फिर्याद दिली आहे.
१४ एप्रिलला रात्री सव्वा नऊच्या सुमारास इक्बाल अब्दुल रहमान खान (वय २९, रा. इंदिरानगर, कुर्ला पुर्व, मुंबई) अहेसान मोहमद कुरेशी (वय २२, कुर्ला, मुंबई) हे दोघे टेम्पोतून मुंबईकडे मांस घेऊन जात असताना त्यांना पोलिसांनी पकडले. त्यातील पाच लाख रुपये किंमतीचे पाच हजार किलो मांस व चार लाख ५० हजार रुपये किंमतीचा टेम्पो असा एकूण नऊ लाख ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस शिपाई सुधाकर शंकर चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.

दरम्यान गोवंशाचे प्रमुख केंद्र असलेल्या संगमनेरमधून संचारबंदीतही कत्तलखाने सुरू असल्याचे समोर आले. जेथे करोनासंशयित व बाधित मिळाले तेथून जवळच असलेल्या कत्तलखान्यातून गोवंशाची कत्तल करण्याचा उद्योग बेमालूमपणे सुरू आहे. ‘अत्यावश्यक’ सेवा वगळता उर्वरीत सर्व प्रकारचे ‘उद्योग’ आणि मालवाहतूकही बंद असताना तब्बल दोन टन गोवंशाचे मांस तीन वाहनांतून घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेल्या आरोपींवर पोलिसांनी करावी केली आहे. संगमनेरातील अवैध कत्तलखान्यांमध्ये जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस मोठ्या प्रमाणात मुंबईकडे नेण्यात येत असताना, ही बाब पोलिसांच्या लक्षात का आली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या कारवाईने लॉकडाऊन काळातही संगमनेरात अवैध कत्तलखाने सुरू असल्याचे पुन्हा समोर आले आहे. वावी पोलीस ठाण्यात या सर्व आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here