यावेळी चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही टीकास्त्र सोडले. संजय राऊत यांच्यापेक्षा धनंजय महाडिक यांना अर्ध मत तरी जास्त मिळायला पाहिजे, हे देवेंद्र फडणवीस यांचे उद्दिष्ट होते. हे उद्दिष्ट पूर्ण झाले. धनंजय महाडिक यांना ४१.५६ मतं मिळाली. तर संजय राऊत यांना ४१ मतं मिळाली, ते राज्यसभा निवडणुकीत सहाव्या क्रमांकावर फेकले गेले, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
तसेच महाविकास आघाडीकडून भाजपने रडीचा डाव खेळला जात आहे, या टीकेलाही चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. महाविकास आघाडीची अवस्था ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी झाले आहे. मला कोणाचं समर्थन करायचं नाही, पण महाराष्ट्रात सत्तेचा किती दुरुपयोग सुरु आहे. एका अभिनेत्रीला एकीकडून सुटली की दुसऱ्या पोलीस स्टेशनला फिरवले जात आहे. ‘थोबाडीत लगावली असती’, हे वाक्य उच्चारले म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक होते. हा सत्तेचा दुरुपयोग नाही का, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला.
पक्षासाठी बायकोचंही ऐकणार नाही: चंद्रकांत पाटील
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांच्या पराभवाबद्दल खंत व्यक्त केली. आम्ही संजय पवार यांना हरवलेले नाही. संजय पवार हा माझ्या घरातला मुलगा आहे. त्यामुळे त्यांच्या पराभवाने मला दु:ख झाले. पण शेवटी मला माझी पार्टी महत्त्वाची आहे. पार्टीसाठी मी माझ्या बायकोचंही ऐकत नाही.उद्या बायको म्हणाली, ते माझे भाऊ आहेत, तरी मी ऐकणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.