यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला. राज्यसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर तुम्ही कोणामुळे जिंकले आहात हे आम्हाला माहितीए, असा दावा मविआतील काही नेत्यांकडून केला जात आहे. त्यांनी खरंच ही गोष्ट माहिती असेल तर ते आपल्याला मदत करणाऱ्यांवर कारवाई करणार नाहीत. याचं कारण म्हणजे महाविकास आघाडीला त्यांचे सरकार टिकवायचे आहे. त्यामुळे मविआ आपल्याला मदत करणाऱ्यांवर कारवाई करायला गेली तर ते आमदार पक्षाची साथ सोडतीलच. पण त्यांच्यासोबत महाविकास आघाडीत असूनही मनाने आपल्यासोबत असलेल्या व दबावामुळे आपल्याला मदत न करू शकणारे आमदारही सरकारमधून निघून जातील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
विधानपरिषद निवडणुकीच्या ६ जागा आपण लढवतो आहोत. कोणतीही निवडणूक सोपी नसते. पण सरकारमधील अंर्तविरोध पाहता आणि ‘सिक्रेट बॅलेट वोट’ सिस्टीम पाहता आपल्याला चांगलं मतदान होईल. सद्सदविवेकबुद्धीला स्मरुन अनेक आमदार आपल्याला मतदान करतील, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
‘बेईमानीने सत्ता मिळवलीत, किमान सरकार तरी चांगल्या पद्धतीने चालवा’
केवळ सरकार चालविण्याकरिता बदल्याची भूमिका ठेवणे योग्य नाही. २०१९ साली मोदींवर विश्वास ठेऊन महाराष्ट्राच्या जनतेने सेना-भाजपला क्लिअर मॅन्डेट दिलं होतं. पण या सत्तेचा अपमान झालं. पण आमच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही बनविलेलं सरकार चालवून दाखवा. एकतरी चांगलं काम करुन दाखवा. अडीच वर्षाचा काळ गेला, पण दाखविण्यासाठी एक काम नाही. मोदी सरकारची कामे या सरकारला दाखवावी लागतात. जीएसटीचा पैसा दिल्यानंतरही यांची सारखी तीच ओरड असते. पेट्रोल डिझेलचे भाव आणखी कमी करायला तयार नाही. पण या सरकारला इंधनाचे भाव कमी करायला लागतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.