पंख्याचा वारा वाढत्या उन्हाळ्यामुळे आता पुरेनासा झाला आहे. गुरुवारी मुंबईच्या किमान तापमानात दोन अंशांची वाढ झाली आणि तापमानाचा पारा २७ अंशांच्या पुढे पोहोचला. पाच वर्षांमधील एप्रिलमधील सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाचे किमान तापमान आहे तर गेल्या दहा वर्षांमधील एप्रिलमधील चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक किमान तापमान आहे. पुढील आठवड्यापर्यंत किमान तापमानाचा पारा २६ ते २७ अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.
गुरुवारी मुंबईकरांची सकाळ उकाड्याने झाली. बुधवारी सांताक्रूझ येथे २५.४ अंश तापमान होते. त्यात दोन अंशाची वाढ होऊन गुरुवारी सकाळी सातांक्रूझ येथे २७.४ आणि कुलाबा २६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. कुलाबा येथे बुधवारी २५.६ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. सरासरी किमान तापमानापेक्षा गुरुवारी किमान तापमान चार अंशांहून अधिक होते. त्यामुळे आता एसीचा वापर वाढण्याची शक्यताही आहे.
वाढलेली आर्द्रता आणि तापमानाचा पारा यामुळे घरात बसूनही मुंबईकर सध्या काहिलीचा अनुभव घेत आहेत. यामध्ये रस्त्यावर राहणाऱ्यांची तर अधिकच दैना होत आहे. शनिवारपर्यंत किमान तापमानाचा पारा २७ अंशांच्या आसपास राहील. त्यानंतर एखाद्या अंशांने तापमान कमी होईल. मात्र पुढील आठवड्यात पुन्हा बुधवारपर्यंत किमान तापमान असेच २७ अंशांच्या आसपास चढे राहील असा अंदाज भारतीय हवामान विभागातर्फे नोंदवण्यात आला आहे. गेल्या दहा वर्षांमधील एप्रिलमधील सर्वाधिक किमान तापमान २८.८ अंश सेल्सिअस होते. तर गेल्या वर्षी २०१९ मध्ये एप्रिल अखेरीस पारा २८.१ अंश सेल्सिअस नोंदवला गेला. सन २०१५ पासून आत्तापर्यंतच्या पाच वर्षांत गुरुवारचे तापमान सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाचे किमान नोंदवले गेले.
गुरुवारी मुंबईच्या किमान आणि कमाल तापमानामध्ये जेमतेम सात अंशांचा फरक होता. कुलाबा येथे ३३.६ तर सांताक्रूझ येथे ३४.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. शुक्रवारीही कमाल तापमान ३४ अंशांच्या आसपास असेल. त्यामुळे दिवसभरात मुंबईत वातावरणात मोठा फरक जाणवण्याची शक्यता कमी आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times