– विरोधी पक्षांच्या २२ नेत्यांना बोलावणे
– आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना डावलले
…
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्लीः पुढच्या महिन्यात होऊ घातलेल्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या दृष्टीने एकजूट होण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यांनी देशातील २२ विरोधी पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहून १५ जूनला दिल्लीत बैठकीसाठी आमंत्रित केले आहे.
राज्यसभेची द्वैवार्षिक निवडणूक पार पडताच विरोधी पक्षांना राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. ममता यांनी पुढाकार घेत विरोधी पक्षांच्या नेत्यांची १५ जूनला दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये दुपारी ३ वाजता बैठक बोलावली आहे. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, राजदचे लालूप्रसाद यादव, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्यासह विविध विरोधी पक्षांच्या २२ नेत्यांना या बैठकीसाठी निमंत्रित केले आहे.
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची अधिसूचना १५ जूनला काढण्यात येणार असून, २९ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. या निवडणुकीसाठी १८ जुलैला मतदान होऊन, २१ जुलैलाजी मतमोजणी करण्यात येईल. निवडणुकीसाठी एकूण १० लाख ८६ हजार ४३१ मतांपैकी केंद्रातील सत्ताधारी भाजपकडे ४८.९ टक्के मते असून, बहुमतासाठी आणखी १३ हजार मतांची आवश्यकता आहे. सर्व विरोधी पक्ष एकजूट झाल्यास भाजपला ही निवडणूक जड जाऊ शकते. पाच वर्षांपूर्वी, २०१७ मध्ये झालेल्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या मीराकुमार विरोधी पक्षांच्या संयुक्त उमेदवार ठरल्या होत्या.
लोकशाहीला वाचविण्यासाठी एकत्र या!
या बैठकीत १८ जुलैला होऊ घातलेल्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांकडून संयुक्त उमेदवार देण्याविषयी चर्चा करण्यात येईल. ममता यांनी या बैठकीसाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना निमंत्रित केलेले नाही. देशात लोकशाही पूर्णपणे संपुष्टात येत असून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा धुळीस मिळाली आहे. अशा स्थितीत लोकशाहीला पुन्हा वाचविण्यासाठी संपूर्ण विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहन ममता यांनी या पत्रात केले आहे.