Shivsena : राज्यसभा निवडणूक निकालानंतर त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. संख्याबळ असतानाही शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव कसा झाला याची चर्चा रंगत असताना दुसरीकडे आता कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांच्या समर्थकांकडून शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी करण्यात आली आहे. संभाजीराजे यांनी शनिवारी शिवसेनेवर निशाणा साधणारे ट्वीट केले होते. त्यानंतर आता थेट शिवसेना भवनसमोरच छत्रपती संभाजीराजे यांच्या समर्थकांनी बॅनरबाजी केली आहे. छत्रपतींचा अपमानचा बदला घेणाऱ्या सर्व आमदार मावळ्यांचे आभार असा मजकूर या बॅनरवर आहे. 

राज्यसभेच्या सहाव्या जागेवर छत्रपती संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणून दावा सांगितला होता. मात्र, शिवसेनेने त्यांना पक्ष प्रवेश करावा अशी अट घातली होती. मात्र, छत्रपती संभाजीराजे यांनी त्याला नकार दिला होता. त्यानंतर छत्रपती संभाजीराजे आणि शिवसेनेत वितुष्ट निर्माण झाल्याची चर्चा होती. अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेणाऱ्या छत्रपती संभाजी यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. 

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संजय पवार यांच्या पराभवानंतर आता छत्रपती संभाजीराजे यांच्या समर्थकांकडून शिवसेनेविरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे. शिवरायांचा गनिमी कावा वापरून छत्रपतींचा अपमानचा बदला घेणाऱ्या सर्व आमदार मावळ्यांचे आभार असा मजकूर या बॅनरवर आहे. त्याशिवाय, ‘राज्यसभा तो झाकी है, स्वराज्य में 2024 अभी बाकी है’ असा मजकूर ही या बॅनरवर आहे. 

राज्यसभेच्या निकालानंतर संभाजीराजेंचा शिवसेनेला टोला

राज्यसभा निवडणूक निकालानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी संत तुकाराम यांचा अभंग ट्वीट करत शिवसेनेवर निशाणा साधला. वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगीं ।।तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होय ।। या ओळी ट्वीट करत छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेला टोला लगावला. वाघाचे पांघरुन घेतल्यावर वाघासारखे दिसता, पण वाघासारखी दशा अंगी येत नाही,असा खोटा आव आणणाऱ्याची लगेचच फजिती होते असा या अभंगाचा अर्थ आहे. 

महाविकास आघाडीचे आणि शिवसेनेचे राज्यसभा निवडणुकीमधील सहावे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला. या पराभवानंतर महाविकास आघाडीमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. आता छत्रपती संभाजीराजे यांच्याकडून शिवसेनेवर टीकास्त्र सोडले जात असताना चिंता व्यक्त केली जात आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here