संपदा जोशी
अभिनेता वैभव मांगलेचं चित्रकलेवरचं प्रेम तुम्हाला माहीत असेल. तो नेहमी त्यानं काढलेल्या चित्रांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. आता लॉकडाऊनमुळे मिळालेल्या मोकळ्या वेळेतही वैभव चित्रकलेत रमला आहे.

वैभव सांगतो, की ‘गेल्या वर्षी जून-जुलैमध्ये माझ्याकडे थोडा मोकळा वेळ होता. तेव्हा मला वाटत होतं, की अभिनयाबरोबरच अजून एखादी कला शिकायला हवी. संगीत आणि चित्रकला या अत्यंत आवडीच्या कला आहेत. त्यापैकी एक शिकावी असा विचार सुरू होता. चित्रकलेतून माणसाला व्यक्त होता येतं. एक ब्रश, चार रंग आणि एक कॅनव्हास असला, तर तुम्ही जणू काही विश्वाची निर्मिती चित्राच्या माध्यमातून करू शकता. चित्रकलेचा अभिनयाशीदेखील संबंध आहे. एखादं सुंदर चित्रं पाहिलं की आपोआपच प्रसन्न वाटतं. त्याचा प्रभाव आपल्या व्यक्तिमत्वावर पडतो. सुरुवातीला मी युट्यूबवर बघून चित्रं रेखाटायचा प्रयत्न करायचो. मग फोटो बघून चित्रं काढू लागलो. अजूनही प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे लवकरच मी स्वतः विचार करुन चित्रं काढू शकेन अशी खात्री आहे. मी एक कलाकार आहे आणि कलाकाराला सर्व कलांबद्दल थोडं ज्ञान हवंच.’

वैभवला वास्तवदर्शी चित्रं काढायला अधिक आवडतात. चित्रकलेसाठी लागणाऱ्या साहित्याबद्दल तो म्हणाला की, ‘योगायोगानं लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी काही दिवस मी रंग घेऊन ठेवले होते. गावाहून मी लाकडी फळ्या आणि पाट आणले होते. त्यामुळे त्यावरदेखील मी पेंटींग केलं. मी दगडसुद्धा रंगवले आहेत. घरामध्ये खिडक्यांच्या खाली बंदिस्त काचा लावल्या आहेत. त्या देखील रंगवल्या आहेत.’

मी कधीही ठरवून चित्र काढत नाही किंवा दिवसातला ठरावीक वेळ त्यासाठी देत नाही. मला जेव्हा चित्रं काढावंस वाटतं, तेव्हा ते मी काढतो. चित्र काढावंसं वाटणं ही एक उर्मी आहे.

वैभव मांगले

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here