जिल्ह्यात सध्या खरीप हंगामाची जोरदार तयारी सुरू आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर दिवसभर कामात व्यग्र असतात. वरोरा तालुक्यातील दिंदोडा परिसरात हरिदास काळे यांचे शेत आहे. शेतात सध्या खरीपाची कामे सुरू आहेत. काळे यांच्या शेतात सोहम हरिदास काळे (२०), शिवम देविदास काळे (वय १२), नितीन बाबाराव काळे (वय २२), ललित बाबाराव काळे (वय २८), कार्तिक हरिदास काळे (वय १७) आणि उज्ज्वला हरिदास काळे (वय ४५) हे काम करीत होते.
शनिवारी दुपारच्या सुमारास अचानकपणे वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळू लागला. यामुळे शेतात काम करणाऱ्या सर्वांनी शेतातील झाडाचा आधार घेतला. परंतु, पावसादरम्यान या झाडावर वीज कोसळली. यात सोहम काळे याचा जागीच मृत्यू झाला, तर शिवम काळे, नितीन काळे, ललित काळे, कार्तिक काळे, उज्ज्वला काळे हे गंभीररित्या जखमी झालेत. सर्व जखमींना वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेमुळे काळे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला असून दिंदोडा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पावसात झाडाखाली थांबणं टाळा!
शेतात काम करताना अचानक आलेल्या पावसात आधार घेण्यासाठी शेतकरी झाडाकडे धाव घेत असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं. मात्र पावसादरम्यान झाडाच्या आश्रयाला जाऊ नये, असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं. कारण झाडावर वीज कोसळण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी वीज कोसळण्याची शक्यता असताना झाडाखाली थांबणं टाळावं, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
पुढील चार तास अलर्ट; जळगावात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस