मालिकेत आतापर्यंत यश आणि नेहाच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. दोघांचा साखरपुडा अतिशय थाटामाटात झाला. त्यानंतर लग्नाच्या विविध विधींना सुरुवात झाली आहे. त्यात मेंदी समारंभ, हळद आणि संगीत समारंभ दणक्यात होत आहेत. परीबरोबरच आपल्याही आयुष्यात सुखाचे दिवस सुरू होणार असल्यानं नेहा देखील आनंदात आहे. लग्नसोहळ्यातील अनेक विधींचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.तसंच नेहा आणि यशच्या लग्नातील लुकही समोर आला आहे. त्या लुकमध्ये दोघंही खूप सुंदर दिसत आहेत. दोघांचा लग्नसोहळ्याचा दोन तासांचा विशेष भाग येत्या रविवारी दाखवला जाणार आहे. तो भाग पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.
यश आणि नेहाचा लग्नसोहळा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. असं असताना सोशल मीडियावर मालिकेचा एक प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमोमध्ये मालिकेत एक रंजक वळण येणार असं दिसतं आहे. मालिकेच्या या नवीन प्रोमोमध्ये यश आणि नेहाच्या लग्नाची बातमी टीव्ही-पेपरमध्ये छापून आली आहे. ही बातमी वाचून एक व्यक्ती पेपरमध्ये आलेली बातमी वाचतो आणि त्यानंतर त्याची घडी घालून तो खिशात ठेवतो. त्यानंतर एका टेम्पोमध्ये बसून नेहा राहते तिथं येतो.. ही व्यक्ती म्हणजे नेहाचा पहिला नवरा असल्याचं सांगितलं जातं आहे.
आता जर नेहाचा नवरा आला तर तिच्या आणि यशच्या लग्नात विघ्न येणार का? की त्यांचं लग्न होणार… नेहाच्या नवऱ्याच्या येण्यामुळे दोघांच्या आनंदाला ग्रहण लागणार का ? अशा विविध प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना आगामी भागातून मिळणार आहे.