मुंबई : राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर भाजपने विजय मिळवल्यानंतर महाविकास आघाडीची अडचण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘राज्यसभा निवडणुकीनंतर अपक्ष आमदारांच्या भूमिकेबाबत आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या. यामध्ये कोणत्याही आमदाराचा अवमान करण्याचा प्रश्न नाही. आम्ही काय बोलतेय हे या अपक्ष आमदारांनाही माहीत आहे आणि भाजपलाही माहीत आहे. आमच्या हातात दोन दिवसांसाठी ईडी दिली तर देवेंद्र फडणवीस हेदेखील शिवसेनेला मतदान करतील,’ असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

‘एका निवडणुकीत विजय झाला आणि पराभव झाला म्हणजे अणुबॉम्ब कोसळला किंवा महाप्रलय आला आणि सगळं वाहून गेलं, असं होत नाही. निवडणूक आयोगाला हाताशी धरून कशा प्रकारे खेळ खेळला जात होता, याची सगळी माहिती आमच्याकडे आहे,’ अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर टीका केली आहे.

फडणवीसांच्या खेळीची अपक्ष आमदाराला भुरळ; म्हणाले, गणित शास्त्राचा योग्य अभ्यास भाजपने केला!

पंकजा मुंडे यांच्यावर पुन्हा भाष्य

भाजपने विधानपरिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारल्यानंतर हे मुंडे-महाजन यांचं नाव पुसण्याचं कारस्थान असल्याचा आरोप शिवसेनेनं केला होता. यावरून पंकजा मुंडे यांची शिवसेनेनं काळजी करू नये, असं प्रत्युत्तर भाजपकडून देण्यात आलं होतं. भाजपच्या या टीकेवरूनही संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. ‘पंकजा मुंडे यांची आम्हाला काळजी असणारच. कारण त्या दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्याशी आमचं कौटुंबिक नातं होतं. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या बाबतीत काही वेगळं होत असेल तर आम्हाला चिंता करण्याचा पूर्ण अधिकार आहे,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here