पिंपरी : राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेना उमेदवार संजय पवार यांचा पराभव करत भाजपच्या धनंजय महाडिक यांना विजय खेचून आणला. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडे आपल्या हक्काची पुरेशी मते नसल्यामुळे ही निवडणूक अटीतटीची ठरली होती. एक-एक मत महत्त्वाचं असताना पिंपरीतील भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि पुण्यातील आमदार मुक्ता टिळक या आजारी असतानाही मतदानासाठी मुंबईला रवाना झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर राज्यसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर धनंजय महाडिक यांनी या दोन्हीही आमदारांना भेटून आभार व्यक्त केले आहेत.

‘विजयोत्सव साजरा करण्याअगोदर माझ्या विजयाचे खरे शिल्पकार असणाऱ्या लक्ष्मणभाऊ जगताप आणि मुक्ताताई टिळक यांची भेट घेतली. स्वत:ची प्रकृती ठीक नसतानाही पक्षाच्या अस्मितेसाठी आपण समर्पित वृत्ती ठेवून मतदानाचा हक्क बजावला. माझ्या विजयामध्ये आपला मोठा वाटा आहे. आपण कर्तव्यनिष्ठेचे एक आदर्श उदाहरण भारतीय राजकारणाला घालून दिले आहे,’ अशा शब्दांत धनंजय महाडिक यांनी आमदार जगताप आणि आमदार मुक्ता टिळक यांचे आभार मानले.

‘मोदी-फडणवीसांनी कारवाई केली तरी चालेल, पण शिवसेनेला साथ देणारच’; भाजप खासदाराचा निर्धार

‘पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा भाजपचा झेंडा फडकवायचा आहे’

लक्ष्मण जगताप यांची भेट घेतल्यानंतर महाडिक म्हणाले की, ‘पिंपरी चिंचवड शहरात आपल्याला जोमाने काम करायचे आहे .पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकवायचा आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर बरे व्हा. तुम्हाला उत्तम आयुष्य लाभो.’

दरम्यान, यावेळी लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप, विजय जगताप आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते.

राज्यसभेची चुरशीची लढाई

राज्यसभेतील सहा जागांसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. त्यावेळी आजारी असणारे पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि कसबा पेठच्या आमदार मुक्ता टिळक या रूग्णवाहिकेतून मतदानासाठी मुंबईत दाखल झाले होते. या निवडणुकीत सहाव्या जागेसाठी झालेल्या लढतीत शेवटच्या क्षणी धनंजय महाडिक विजयी झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here