सिनेमाचा फक्त आशय चांगला असून चालत नाही. त्या आशयाला पुढं नेणारी सशक्त अशी कथा आणि पटकथा असावी लागते. सिनेमाच्या दृश्यशैलीत मांडण्यासाठी त्यात ‘ट्विस्ट अँड टर्न्स’ असावे लागतात. मोठी स्टारकास्टही काही फायद्याची नसते. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत प्रदर्शित झालेल्या आणि दक्षिणेकडील दिग्दर्शक सिम्मी जोसेफ दिग्दर्शित ‘अन्य’चा आशयही निश्चित चांगला आहे. मात्र, सिनेमा म्हणून तो अतिशय संथ आणि कंटाळवाणा झाला आहे. बडे स्टारकास्ट असूनही, उत्तम टीम हाती असूनही चित्रपटाचा एकूण प्रभाव फारसा पडत नाही.

दिव्याला () देशातील ज्वलंत अशा सामाजिक प्रश्नांवर माहितीपट करायचा आहे. त्यासाठी पत्रकार मित्र असलेला दीपक () आणि सामाजिक कार्यकर्ता, पक्का कम्युनिस्ट अरिंदम () यांची मदत ती घेत आहे. झोपडपट्टीत राहणारा आणि छोट्या-मोठ्या चोऱ्या करणारा सरताज () छुप्या कॅमेऱ्याद्वारे या माहितीपटासाठी मदत करण्याचे ठरवतो आणि एक एक धक्कादायक विश्व या सर्वांपुढं उलगडत जातं. हाती असलेल्या कथेला तथाकथित ‘सामाजिक’ अँगल द्यायचा इथं पुरेपूर प्रयत्न केला जातो. म्हणजे मानवी तस्करीपासून, ते झोपडपट्ट्यांच्या प्रश्नापर्यंत आणि विदर्भातील शेतकरी आत्महत्यापासून राजकारणातील भ्रष्टाचारापर्यंत सारं काही एकाच छताखाली दाखवण्याचा अट्टहास लेखक-दिग्दर्शक धरू पाहतो. मग त्या ओघाने येणारी लेक्चरबाजीही होते. अखेर दिव्या हा माहितीपट तयार करते का? या सर्व परिस्थितीला राजकारणाची नक्की कोणती किनार आहे? दिव्या-दीपक-अरिंदम यांचे नातेसंबंध कसे आहेत, अशा प्रश्नांच्या उत्तरासाठी ‘अन्य’ पाहायला हवा.

अरिंदमचा भूतकाळ, त्याचे नक्षलवाद्यांशी असणारे मैत्रीचे संबंध, बाबूरामजी (सुनील तावडे) या राजकारण्याचे कारनामे असे अनेक छोटे मोठे ‘ट्रॅक’ कथेत येत राहतात. काही गोष्टी उलगडून सांगितल्या जातात, काही तशाच सोडून टाकल्या जातात, तर काहींची उत्तरे शोधण्याचे कष्ट प्रेक्षकांवरच ढकलले जातात. म्हणजे थोडक्यात काय, तर उत्तम अभिनेते, तंत्रज्ञान घेऊन एक सामाजिक आशयाची कथा पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न केला जातो. हा प्रयत्न ‘प्रयत्न’ याच स्तरावरचा राहतो, हे वेगळं सांगायची गरज नाही. सिनेमा एकाच वेळी अनेक गोष्टी मांडू पाहतो. मात्र, निश्चित ‘फोकस’ कशावर करायचा याचा लेखक-दिग्दर्शकाचा गोंधळ पदोपदी जाणवत राहतो; तसंच सिनेमाची एकूण मांडणीही अतिशय विस्कळित आणि तुटक वाटते. एकाच वेळी लव्हस्टोरी, क्राइम, पॉलिटिक्स अशी भेळ दाखवण्याचा प्रयत्न कशासाठी, हा प्रश्न वारंवार पडत राहतो. अरिंदम या तत्त्वनिष्ठ व्यक्तीची व्यक्तिरेखाही खूप गोंधळाची आहे.

अतुल कुलकर्णी, रायमा सेन, भूषण प्रधान, , प्रथमेश परब यांच्यासह सर्वच कलाकार आपापल्या भूमिका उत्तम पार पाडतात. काही गाणी सिनेमात आहेत. मात्र, ती सिनेमाचा जरा बरा असलेला ‘टेम्पो’ बिघडवण्याचेच काम करतात. एकूणात काय ‘सारं काही एका छताखाली’ अशा बॅनरखाली ‘अन्य’ नावाचा चित्रपट साकार होतो. मात्र, हे सारं काही दाखवण्याच्या नादात सगळा मामला एकंदरितच फसला आहे. दोन-अडीच तास त्यासाठी द्यावा; की ‘अन्य’ पर्याय निवडावा, याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे.

निर्माते : शेलना के. आणि सिम्मी

दिग्दर्शक : सिम्मी

संवाद : महेंद्र पाटील

छायांकन : सज्जन कालाथील

कलाकार : अतुल कुलकर्णी, रायमा सेन, भूषण प्रधान, प्रथमेश परब, तेजश्री प्रधान, ,

दर्जा : दोन स्टार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here