सिंधुदुर्ग : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजप आणि महाविकास आघाडीने जोरदार ताकद लावल्याने ही निवडणुकीत प्रतिष्ठेची झाली होती. अटीतटीच्या लढतीत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी बाजी मारत शिवसेनेच्या संजय पवार यांना पराभवाची धूळ चारली. या पार्श्वभूमीवर भाजपचा आत्मविश्वास दुणावला असून भाजप नेत्यांकडून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला लक्ष्य करण्यात येत आहे. अशातच भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

‘शिवसेनेची स्वत:ची मते त्यांच्या उमेदवाराला मिळालेली नाहीत, तर संजय राऊत फक्त एका मताने पराभूत होण्यापासून वाचले. महाविकास आघाडीचे आठ ते नऊ आमदार फुटले आहेत. याचाच अर्थ सरकार अल्पमतात आले आहे. बहुमतासाठी १४५ आमदारांचं पाठबळ लागतं, तुमच्याकडे तेही नाही. तुम्ही महाराष्ट्राला १० वर्ष मागे नेलं आहे. उद्धव ठाकरे यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, अशी टीका करत नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

आधी विजयाच्या शिल्पकारांचे आभार, नंतरच जल्लोष! महाडिकांनी घेतली भाजपच्या लढवय्या आमदारांची भेट

राज्यसभेवर निवडून आलेल्या उमेदवारांचे अभिनंदन करत सिंधुदुर्ग जिल्हा भाजपकडून जल्लोष करण्यात आला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नारायण राणे आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची उपस्थिती होती.

‘शरद पवारांकडून काहीतरी शिका’

लोकांची जमावजमव करण्यात त्यांना यश आलं, असं म्हणत राज्यसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं होतं. यावरून राणे यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे. ‘मी संजय राऊत यांना काहीही किंमत देत नाही, त्यांनी शरद पवारांकडून काहीतरी शिकावं,’ असा नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here