आपल्या कामातूनच नव्हे तर आयुष्यात आलेल्या संकटातूनही प्रोत्साहन देणाऱ्या सोनालीवर म्हणूनच तिचे चाहते फिदा असतात. पण नुकत्याच एका मुलाखतीत सोनालीने २८ वर्षापूर्वी नाईलाजास्तव केलेल्या एका गोष्टीचा खुलासा केला आहे. पैशांसाठी तिला मनाविरूध्द एक असं काम करावं लागलं की तिच्यासमोर पर्याय नव्हता. तंबाखूजन्य पदार्थांचं कधीच समर्थन करणार नाही असं सांगताना तिने २८ वर्षापूर्वी बीअरची जाहीरात का केली याचा खुलासा केला आहे.
फिल्मफेअरच्या या मुलाखतीत सध्या सेलिब्रिटी कलाकारांवर तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहीरातीविषयी तिचं काय मत आहे यावर चर्चा सुरू होती. कलाकार काय करतात याचा समाजावर प्रभाव पडत असल्याने कलाकारांनी व्यसनांना प्रोत्साहन देणाऱ्या जाहीराती करू नयेत असं मत सोनालीनं व्यक्त केलं. पण तिने तिच्या बाबतीत घडलेली एक घटनाही कबूल केली. सोनालीने तिच्या बॉलिवूडमधील सुरूवातीच्या दिवसात एक बीअरची जाहिरात केली होती. याविषयी खुलासा करताना सोनाली म्हणाली, आयुष्यात नाईलाजाने केलेली बीअरची ती एक जाहीरात सोडली तर मी कधीच तंबाबूजन्य पदार्थांचं समर्थन केलं नाही. मग असं काय कारण होतं की सोनालीला बीअरची जाहिरात करावी लागली? याचंही उत्तर तिनं या मुलाखतीत दिली.
सोनाली ९०च्या काळात एक लोकप्रिय अभिनेत्री होती. त्यावेळी ती मुंबईत भाड्याच्या घरात राहत होती. त्यावेळी तिला घराचं भाडं देण्यासाठी काही पैसे कमी पडत होते, त्याचदरम्यान तिच्याकडे बीअरच्या जाहीरातीची ऑफर आली. त्या जाहिरातीतून मिळालेल्या पैशांतून सोनालीने घराचे भाडे दिले. पण त्यानंतर तिने अशाप्रकारच्या तंबाखू, धूम्रपानाला प्रोत्साहन देणाऱ्या जाहीराती करायच्या नाहीत असा निर्णय घेतला.
सोनालीला कॅन्सर झाला तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच हादरली, सोनालीने दीड वर्षे अमेरिेकेत राहून कॅन्सवरील उपचार घेतले. त्याकाळात ती सोशल मीडियावर कॅन्सरबाबत प्रबोधन करत होती. तिने अनेक अनुभवही शेअर केले. कॅन्सरवर मात करून ती पुन्हा तिच्या अभिनय क्षेत्राकडे वळली आहे. डीआयडी लिटिल मास्टर्स या रिअॅलिटी शोची जज म्हणून तिने कमबॅक केलं. लोकप्रिय नायिका, कॅन्सरग्रस्त आई ते पुन्हा नव्या दमाची अभिनेत्री असा प्रवास करणाऱ्या सोनालीला तिच्या मजबुरीमुळे बीअरची जाहिरात करावी लागली होती या सत्याचा उलगडा तिनं केला आहे.
सोनाली सध्या सिनेमात दिसत नसली तरी ती ऑनस्क्रिन खूप गोष्टी करत आहे. अनेक जाहीरातींमध्ये सोनालीचं दर्शन होतं. लवकरच सोनाली द ब्रोकन न्यूज या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सिनेमात डेब्यू करणार आहे.