राज्यसभा निवडणुकीच्या भाजपच्या तीन जागा निवडून आणण्याचा अशक्यप्राय प्रयोग यशस्वी करीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला जोरदार दणका दिला. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, डॉ. अनिल बोंडे यांना सहज निवडून आणत तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांचा विजय फडणवीसांनी अक्षरश: खेचून आणला. या विजयानंतर महाडिकांना आभाळ ठेंगणं झालं आहे. कारण गेल्या चार-पाच वर्षात पराभवाने महाडिकांची पाठ सोडली नव्हती. पण फडणवीसांच्या चाणाक्ष खेळीने अपक्षांना हाताशी धरुन महाडिकांच्या कपाळी विजयाचा टिळा लागला.
कोल्हापुरात महाडिकांचं दणक्यात स्वागत!
मुंबईतील प्रदेश कार्यालयात भाजपच्या तीनही नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार समारंभ काल मोठ्या हर्षोल्लासात संपन्न झाला. कालचा सत्कार समारंभ आटपून महाडिक कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले. वाटेत पुण्यात थांबून, त्यांच्यामुळे त्यांच्या कपाळी विजयाचा टिळा लागला त्या आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांची रुग्णालयात जाऊन महाडिकांनी भेट घेतली. त्यांना धन्यवाद दिले तसेच त्यांचे आशीर्वादही घेतले.
आज दुपारी धनंजय महाडिक यांचं कोल्हापुरात आगमन झालं. हजारो कार्यकर्ते त्यांच्या स्वागताला हजर होते. फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. फटाक्यांची आतिषबाजी सुरु होती. डीजेच्या तालावर कार्यकर्ते बेभान होईन नाचत होते. धनंजय महाडिक यांचा खास कोल्हापुरी फेटा घालून सत्कार करण्यात आला. त्यांच्या खांद्यावर विजयाचा गुलाल टाकून कार्यकर्त्यांनी त्यांनाही खांद्यावर घेतलं. कार्यकर्त्यांबरोबर धनंजय महाडिकांनीही डीजेच्या गाण्यावर ताल धरला.
दिलेल्या संधीचं सोनं करेल : धनंजय महाडिक
“काल राज्यसभा निवडणूक निकाल जाहीर झाला. भाजपने माझ्यासारख्या सामान्य युवकाला संधी दिली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आभार मानतो. पक्षाचं काम मोठ्या जोमात आणि जोशात करेन. मला दिलेल्या संधीचं सोनं करेल, असा विश्वास त्यांनी भाजप नेत्यांना दिला.