पुणे : पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. थेट वाहतूक पोलीस आता दंड आकारणार नाहीयेत. सीसीटीव्हीच्या माध्यमातून आता पुण्यात दंड आकारला जाणार आहे. वाहतूक पोलिसांकडून दंडाच्या रुपात लूट होत असल्याच्या शेकडो तक्रारीनंतर पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तूर्तास तरी पुणेकर सुटकेचा निश्वास सोडणार आहे.

कोणताही नियम मोडला नसताना पोलीस हवालदार अनेक वाहन चालकांकडून बेकायदेशीररित्या पैसे घेतात, अशा स्वरुपाच्या शेकडो लिखित तक्रारी पुणेकरांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे केल्या होत्या. तसेच नागरिकांनी यासंदर्भातील निवेदन पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही दिलं होतं. नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेता पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेत पुढील आदेशापर्यंत वाहतूक पोलिसांना दंड आकारता येणार नाही, असा निर्णय घेतला आहे.

पुढील आदेशापर्यंत वाहतूक पोलिसांनी कोणत्याही स्वरुपाची दंडात्मक रक्कम वसूल करु नये. आपण फक्त वाहतूक सुरळित करण्यासाठी अधिकचे प्रयत्न करावेत. शहरात असलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून दंड आकारला जाईल, असं पत्रकच पुणे पोलीस आयुक्तांनी काढलं आहे.

कारवाई फक्त ‘टोइंग’चीच
‘टोईंग’चा भुर्दंड कशासाठी, पुणेकरांचा सवाल

नो पार्किंगमधील वाहनांवर कारवाईसाठी जॅमर किंवा ई चलन हे पर्याय उपलब्ध असताना ‘टोईंग’चा भुर्दंड कशासाठी, असा सवाल पुणेकर नागरिक उपस्थित करत होते. मुंबईत ‘नो-पार्किंग’मधील वाहने उचलून नेण्याची कारवाई प्रायोगिक तत्त्वावर बंद केल्यानंतर पुण्यातही तसा प्रयोग राबविण्याची मागणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र टाइम्स’ने वृत्तमालिका देखील प्रसिद्ध केली होती.

वाहतूक पोलिसांकडून प्राप्त झालेल्या ‘नो-पार्किंग’ कारवाईच्या आकडेवारीवरून धक्कादायक बाब समोर आली आहे. वाहतूक पोलिस सद्यस्थितीत केवळ वाहने उचलण्याचीच कारवाई करीत आहेत. वाहतुकीला अडथळा न ठरणारी वाहनेही ‘टो’ केली जात असल्याचे स्पष्ट होते. ‘नो-पार्किंग’च्या एकूण कारवाईत केवळ २० टक्के वाहनांवर जागेवरच कारवाई केली जाते. यात प्रामुख्याने चारचाकी आणि तीनचाकी वाहनांचा समावेश आहे. ही वाहने ‘टो’ करण्यासाठी तुलनेने नगण्य ‘क्रेन’ उपलब्ध आहेत. त्यामुळे ही कारवाई जागेवरच केली जाते, अशी माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here