मुंबई: राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेशी दगाबाजी केल्याचा आरोप असणारे आमदार देवेंद्र भुयार यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अपक्ष आमदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यापर्यंत पोहोचताच येत नाही. याउलट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे कोणत्याही आमदाराचे प्रश्न सोडवण्यासाठी, त्यांचे म्हणणे ऐकून घेतात. मी आज सकाळी त्यांना पहाटे पाच वाजता भेटीसाठी फोन केला होता. त्यांनी मला लगेच भेटीसाठी ७.४५ ची वेळ दिली, असे देवेंद्र भुयार यांनी सांगितले. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (MLA Devendra Bhuyar upset with CM Uddhav Thackeray work style)

यावेळी देवेंद्र भुयार यांनी अपक्ष आमदारांच्या विश्वासहर्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या संजय राऊत यांच्या आरोपांचा इन्कार केला. अपक्ष आमदारांवर कायम अविश्वास दाखवायचा, हे योग्य नाही. मी अजित पवार यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यसभा निवडणुकीत मतदान केले. शिवसेनेची भूमिका अशीच राहिल्यास भविष्यात तुमच्यासोबत राहायचे की नाही, याचा विचार करु, असा इशारा भुयार यांनी दिला होता. पण यानंतर त्यांनी यावर सारवासारव केली. मी भाजपसोबत जाणार नाही. उद्या संजय राऊत यांनी मतदान करु नका असे सांगितले तरी मी महाविकास आघाडीलाच मतदान करेन. कारण, मला भाजपची विचारसरणी पटत नाही, असे देवेंद्र भुयार यांनी स्पष्ट केले.
राऊतांनी आरोप केलेल्या आमदाराला शरद पवार म्हणाले, तुझ्याबाबत आम्हाला अजिबात शंका नाही!

‘फक्त मतांसाठी अपक्ष आमदारांना फोन, नंतर त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिलं जात नाही’

देवेंद्र भुयार यांनी महाविकास आघाडीसोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले असले तरी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शिवसेनेतील काही नेते आम्हाला मुख्यमत्र्यांपर्यंत पोहोचून देत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे झारीतील शुक्राचार्य ओळखले पाहिजेत, असे वक्तव्य देवेंद्र भुयार यांनी केले. तसेच मतांचा विषय संपला की अपक्ष आमदारांना नंतर विचारलेही जात नाही, अशी खंतही भुयार यांनी बोलून दाखवली. जेव्हा सरकारला मतांची गरज असते तेव्हा अपक्ष आमदारांना ग्रँड हयात, ट्रायडंट यासारख्या फाईव्हस्टार हॉटेल्समध्ये बोलावले जाते. मात्र, एकदा का निवडणूक संपली की, अपक्ष आमदारांच्या तोंडाकडे कोणी बघत नाही. हे अपक्ष आमदारांचं दुर्दैव आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये मत देताना आम्ही काही गोष्टी कबूल करून घेणार आहोत, असे देवेंद्र भुयार यांनी म्हटले.

मात्र, यावेळी देवेंद्र भुयार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कौतुक केले. अपक्ष आमदारांना सरकारच्या लेखी फक्त निवडणुकीपुरते स्थान असते. नंतर त्यांच्या निधीबाबत किंवा इतर प्रश्न सोडवले जात नाहीत. मात्र, आम्हाला केवळ एकच आधार आहे, तो म्हणजे मंत्रालयाचा सहावा माळा, अजित पवार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटीसाठी वेळ देत नाहीत. अपक्ष आमदार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये समन्वय नाही, ही गोष्ट मी संजय राऊत यांनाही बोलून दाखवली होती. त्यांनीदेखील ही बाब कबूल केल्याचे देवेंद्र भुयार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here