भाजपचे संख्याबळ १०६ असून काही अपक्ष आमदार त्यांच्यासोबत आहेत. विधानपरिषदेत प्रत्येक आमदाराला निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची २७ मते आवश्यक आहेत. या गणितानुसार, भाजपचे पहिले ४ उमेदवार सहज निवडून येतील. तर पाचव्या जागेवरील प्रसाद लाड यांना निवडून आणण्यासाठी काही मतांची तजवीज करावी लागेल. पाचवीच जागा जिंकण्यासाठी भाजपला १३० मतांची गरज लागेल. यामध्येच भाजपची बरीच दमछाक होईल. मात्र, यानंतरही देवेंद्र फडणवीस यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या सदाभाऊ खोत यांना निवडून आणण्याची किमया घडवल्यास तो ठाकरे सरकारसाठी मोठा धक्का ठरेल. कारण, सहाव्या जागेसाठी भाजपला किमान १५० तरी मते लागतील. राज्यात सत्तास्थापनेसाठी मॅजिक फिगर अर्थात बहुमताचा आकडा हा १४४ इतका आहे. त्यामुळे विधानपरिषेदत सहावी जागा निवडून आणल्यास भाजप आपोआपच बहुमताचा आकडा गाठेल. गुप्त मतदान पद्धतीमुळे ही शक्यता आणखी वाढली आहे. त्यामुळे विधानपरिषदेची निवडणूक ही एका अर्थी ठाकरे सरकारची परीक्षा असेल, असे राजकीय जाणकारांकडून सांगितले जात आहे.
विधान परिषदेला खडसे, पाडवींचा गेम होणार?
राज्यसभेनंतर आता विधान परिषदेतही महाविकास आघाडीला जोरदार झटका देण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. हा झटका काँग्रेसच्या भाई जगताप यांना बसण्याची शक्यता असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात असले, तरी प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे आमशा पाडवी यांनाच भाजपकडून टार्गेट केले जाण्याची शक्यताच अधिक आहे. भाजप काहीही करून एकनाथ खडसे यांच्या विरोधात मोठा सापळा रचणार, तसेच शिवसेनेला टार्गेट करण्यासाठी पाडवी यांच्यामागेही भाजप लागणार, असे त्यांचे नेते खासगीत सांगत आहेत. आमशा पाडवी हे आदिवासी समाजातील असून, त्यांचा आमदारांशी फारसा संपर्कही नाही. तसेच शिवसेनेचे दुसरे उमेदवार सचिन अहिर हे माजी मंत्री असून, त्यांचे सर्व पक्षांत मित्र आहेत. भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड हे देखील अहिर यांचे मित्र असल्याने अहिर यांच्या मतांवर भाजपकडून डल्ला मारण्याचा फारसा प्रयत्न होणार नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.