president election in india: राष्ट्रपतीपदासाठी शरद पवारांना काँग्रेसचा पाठिंबा, काय बोलले नाना पटोले? पाहा… – presidential election in india congress support sharad pawar
राज्यसभा निवडणुकीनंतर आता राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत विरोधी पक्षांचा उमेदवार कोण असेल याची उत्सुकता आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपतीपदासाठी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे.
राष्ट्रपतीपदासाठी पवार यांना काँग्रेसचा पाठिंबा, काय बोलले नाना पटोले? पाहा…
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शरद पवार यांना राष्ट्रपतीपदासाठी काँग्रेसचा पाठिंबा जाहीर केला आहे. शरद पवार यांच्याकडे राष्ट्रपतीपद येणार असेल, तर काँग्रेसचा त्याला पूर्ण पाठिंबा असेल, असे मत नाना पटोले यांनी रविवारी समाजमाध्यमावर व्यक्त केले. राष्ट्रपती निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधकांची मोट बांधण्यास पुढाकार घेतला आहे. १५ जून रोजी दिल्लीत एका संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले असून शरद पवार यांच्यासह देशभरातील प्रमुख नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. ‘महाराष्ट्राची व्यक्ती देशाची राष्ट्रपती होत असेल, तर याचा मला आनंदच होईल. शरद पवार यांच्याकडे राष्ट्रपतीपद येणार असेल, तर काँग्रेसचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे’, असे ट्वीट नाना पटोले यांनी केले. आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनीही शरद पवार यांची भेट घेतली. भेटीत अनेक विषयांवर चर्चा झाली असली, तरी भेटीमागचे प्रमुख कारण राष्ट्रपतीपदाची निवडणूक असल्याचे समजते. या भेटीदरम्यान संजय सिंह यांनी राष्ट्रपतीपदासंदर्भात शरद पवार यांच्याशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.