या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रीय पातळीवर भाजपविरोधी गटातील नेत्यांमध्ये भेटीगाठींचे सत्र सुरु आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आम आदमी पक्षाचे (आप) खासदार संजय सिंह यांनी नुकतीच शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत झालेल्या चर्चेबाबत आप किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून फारशी वाच्यता करण्यात आलेली नाही. परंतु, ‘आप’चा शरद पवार यांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीला पाठिंबा असल्याचे सांगितले जाते. आपचे खासदार संजय सिंह आणि शरद पवार यांच्यात याविषयी चर्चाही झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत शरद पवार हे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उतरणार की नाही, हे स्पष्ट होईल. तर दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा वापर करत राष्ट्रपतीपदासाठी कोणता उमेदवार देतात, हेदेखील पाहावे लागेल.
राष्ट्रपतीपदासाठी शरद पवारांना काँग्रेसचा पाठिंबा
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शरद पवार यांना राष्ट्रपतीपदासाठी काँग्रेसचा पाठिंबा जाहीर केला आहे. महाराष्ट्राची व्यक्ती देशाची राष्ट्रपती होत असेल, तर याचा मला आनंदच होईल. शरद पवार यांच्याकडे राष्ट्रपतीपद येणार असेल, तर काँग्रेसचा त्याला पूर्ण पाठिंबा असेल, असे ट्विट नाना पटोले यांनी केले होते. राष्ट्रपती निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधकांची मोट बांधण्यास पुढाकार घेतला आहे. १५ जून रोजी दिल्लीत एका संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले असून शरद पवार यांच्यासह देशभरातील प्रमुख नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीत शरद पवार यांच्या राष्ट्रपती पदाबाबतच्या उमेदवारीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.