मुंबईतील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेने ९७ फिवर क्लिनिक सुरू केले आहेत. त्यात आतापर्यंत ३५८५ लोकांची प्राथमिक तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये ९१२ लोकांमध्ये करोनाची सौम्य लक्षणे दिसून आली. त्यामुळे त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले असता त्यात केवळ ५ लोकांना करोना झाल्याचं आढळून आलं. त्याच आधारे पालिकेने हा दावा केला आहे. मुंबईतील रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी मुंबईत कम्युनिटी ट्रान्समिशन सुरू झालं नसल्याचं पालिकेने म्हटलं आहे. याचाच अर्थ करोना विषाणू मुंबईत अद्याप दुसऱ्या टप्प्यातच आहे. कारण करोना विषाणू तिसऱ्या टप्प्यात पोहोचल्यावर कम्युनिटी ट्रान्समिशन सुरू होतं, असंही पालिकेने स्पष्ट केलं आहे.
ज्या ठिकाणी करोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे, त्या ठिकाणाला कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. या ठिकाणी राहणाऱ्यांसाठी फिवर क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. या फिवर क्लिनिकमध्ये कंटेन्मेंट झोन परिसरात राहणाऱ्या आणि करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करण्यात येत आहे. फिवर क्लिनिकमध्ये ९१२ पैकी जे पाच लोक बाधित आढळले ते परेदशातून आलेल्यांच्या संपर्कात आले होते, असं सूत्रांनी सांगितलं.
६ हजार लोकांनी फोन केले
करोना रुग्ण शोधण्यासाठी पालिकेने ०२० ४७०८५०८५ ही हेल्पलाइन सुरू केली होती. या हेल्पलाइनवर आतापर्यंत ६ हजार लोकांनी संपर्क साधला आहे. या ६ हजार लोकांना तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केलं आहे. यात सर्दी, खोकला, ताप आणि श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या रुग्णांचा सर्वाधिक समावेश होता. यातील ३०० लोकांना करोनाची चाचणी करण्यास सांगण्यात आलं. तर १२०० लोकांना होम क्वॉरंटाइन होण्याचा सल्ला देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times